क्राईम

मुळेगाव तांड्यावर एलसीबीचा मोठा छापा; 17.47 लाखांचा अवैध हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त

'दारू माफियांना पाठीशी घालणार नाही' : एसपी अतुल कुलकर्णी यांचा इशारा

मुळेगाव तांड्यावर एलसीबीचा मोठा छापा; 17.47 लाखांचा अवैध हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त

‘दारू माफियांना पाठीशी घालणार नाही’ : एसपी अतुल कुलकर्णी यांचा इशारा

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अवैध हातभट्टी व्यवसायाविरोधात मोठी धडक कारवाई करत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे 17 लाख 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला असून चार सराईत हातभट्टी व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोलापूर तालुका पोलिसांच्या मदतीने शनिवारी ही कारवाई केली.

छाप्यामध्ये हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, लोखंडी व प्लास्टिक बॅरल, गुळ-मिश्रित रसायने, चुली तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून JCB मशीनच्या सहाय्याने संपूर्ण अड्डाच जमीनदोस्त केला. विशेष म्हणजे कारवाईदरम्यान ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर नजर ठेवण्यात आली, त्यामुळे कोणतीही हालचाल पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही.

या प्रकरणी अवैध हातभट्टी व्यवसायासाठी साहित्य साठवून ठेवल्याप्रकरणी चार सराईत व्यावसायिकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. संबंधित आरोपींवर केवळ गुन्हे दाखल करून थांबणार नसून आवश्यकतेनुसार हद्दपार आणि एमपीडीएसारख्या प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, आरसीपी पथक आणि ड्रोन पथकाच्या संयुक्त सहभागातून यशस्वीरीत्या पार पडली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!