७/१२ उताऱ्याचा ‘लॉक’ काढण्यासाठी ३ हजारांची मागणी; मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
७/१२ उताऱ्याचा ‘लॉक’ काढण्यासाठी ३ हजारांची मागणी; मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
सोलापूर (प्रतिनिधी):- शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकाकडून लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहात पकडल्याची घटना बार्शी तालुक्यात उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत चंद्रकांत फुलारी (वय ५३) हे उपळे (दुमाला) मंडळ, तहसील कार्यालय बार्शी येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराने आपल्या आजीचे नाव शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस म्हणून नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, ही नोंद प्रमाणित करण्यासाठी आणि ७/१२ उताऱ्यावरील ‘लॉक’ काढण्यासाठी फुलारी यांनी ३,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने याबाबत ACB सोलापूरकडे तक्रार दाखल केल्यानंतर २८ एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान आरोपी फुलारी यांनी ३,००० रुपये स्वतः स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी वैराग पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते यांच्यासह ACB सोलापूर पथकाने सहभाग घेतला.
*नागरिकांना आवाहन*
शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी किंवा त्यांचे एजंट कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.
संपर्क माहिती
टोल फ्री : १०६४
व्हॉट्सअॅप : ९४०४००१०६४
दूरध्वनी : ०२१७-२३१२६६८
संकेतस्थळ : www.acbmaharashtra.gov.in



