मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सोलापूरात भव्य विजयी मेळावा; तयारी पूर्ण
२० हजारांसाठी व्यवस्था, १०० कुलरची सोय

मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सोलापूरात भव्य विजयी मेळावा; तयारी पूर्ण
२० हजारांसाठी व्यवस्था, १०० कुलरची सोय
सोलापूर (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी होणाऱ्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात तयारी पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमासाठी प्रशासन आणि पक्ष पदाधिकारी पूर्ण क्षमतेने सज्ज झाले आहेत.
सोमवारी सायंकाळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पोलीस प्रशासनासह सभास्थळाची पाहणी करून सुरक्षा व व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या मेळाव्याच्या निमित्ताने आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार १३७८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. तसेच अक्कलकोट रोड व होटगी रोड औद्योगिक वसाहतींसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आयटी पार्क, अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच उजनी धरण परिसरातील फ्लोटिंग सोलार व एआय प्रकल्पांमुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, सोलापूरकरांनी निवडणुकांमध्ये भाजपाला दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस शहरवासीयांचे आभार मानणार आहेत. या सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.
दरम्यान, या सभेसाठी उभारण्यात आलेली व्यवस्था लक्षवेधी ठरत आहे. १०० बाय ३०० फुटांचे तीन भव्य मंडप उभारण्यात आले असून, ४० बाय ६० फुटांचे प्रशस्त व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. सुमारे २० हजार नागरिकांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली असून, ५०० सोफ्यांचीही सोय करण्यात आली आहे.
उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. १०० मोठे कुलर, ६ वातानुकूलित यंत्रणा, तसेच ३० हजार पाण्याच्या बाटल्या आणि २०० जार यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.
एकूणच, सोलापूरमध्ये होणारा हा मेळावा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता विकास आणि कृतज्ञतेचा उत्सव ठरणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





