सोलापूर

“उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सर होत नाही; अधिकृत अहवालातून अफवांना पूर्णविराम”

“उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सर होत नाही; अधिकृत अहवालातून अफवांना पूर्णविराम”

सोलापूर : सोलापूर शहरातील नागरिकांना पुरवठा करण्यात येणारे पिण्याचे पाणी पूर्णपणे सुरक्षित, शुद्ध आणि भारतीय मानकांनुसार असल्याचे अधिकृत प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले आहे. उजनी धरणाच्या पाण्यामुळे कॅन्सर होतो, अशा सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमधून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना सोलापूर महानगरपालिकेने ठोस वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे उत्तर दिले आहे.

सोलापूर शहराला उजनी जलाशय योजना, भीमा नदी पाणीपुरवठा योजना आणि एकरुख उपसा सिंचन योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यावर पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शुद्धीकरण प्रक्रिया राबविली जाते. गाळणीकरण, निर्जंतुकीकरण आणि विविध गुणवत्ता नियंत्रण चाचण्यांनंतरच हे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवले जाते.

पाणी गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या कच्च्या पाण्याचे तसेच शुद्धीकरणानंतरच्या पाण्याचे नमुने नियमितपणे तपासले जातात. याच अनुषंगाने NABL मान्यताप्राप्त एफएचएचएल (Food Hygiene & Health Laboratory) प्रा. लि., पुणे या संस्थेकडून पाण्याच्या नमुन्यांची सखोल तपासणी करण्यात आली.

या तपासणीमध्ये शुद्धीकरणानंतरचे पाणी भारतीय मानक संस्था (BIS) च्या IS 10500:2012 या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ताविषयक निकषांनुसार ‘Acceptable Limit’ मध्ये आढळून आले आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुरवले जाणारे पाणी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत करण्यात आलेल्या पाणी तपासणीतही कोणतेही धोकादायक किंवा आरोग्यास अपायकारक घटक आढळून आले नव्हते. त्यामुळे विविध स्तरांवर झालेल्या तपासण्यांमधून पाण्याच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे.

महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, उपलब्ध अधिकृत अहवालांमध्ये पाण्यात कॅन्सरजन्य धोका निर्माण करणारा कोणताही घटक आढळलेला नाही. त्यामुळे उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सर होतो, अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

सोलापूर महानगरपालिका नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी, देखरेख आणि आवश्यक उपाययोजना सातत्याने सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांनी अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!