“डॉ. सतीश कोपूरवाड यांची करजगी आरोग्य केंद्राला भेट; रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना”

“डॉ. सतीश कोपूरवाड यांची करजगी आरोग्य केंद्राला भेट; रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना”
अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट तालुक्यातील करजगी परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीसाठी प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि दर्जेदार करण्याच्या उद्देशाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी करंजगी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य ॲड. विकास बुळा यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत व बाह्य परिसराची सविस्तर पाहणी केली. करजगी येथे मंजूर झालेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी प्रस्तावित जागेची तपासणी करण्यात आली. भविष्यात उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य ॲड. विकास बुळा यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या नियोजनासंदर्भात विविध सूचना मांडत, करजगीसह परिसरातील गावांतील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. रुग्णालयाच्या उभारणीमुळे नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जाण्याची गरज कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या, गरजा आणि अडीअडचणी जाणून घेत त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर, प्रभावी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या भेटीदरम्यान सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, सरपंच विवेकानंद उंबरजे, उपसरपंच शब्बीर पटेल, वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर पटेल, डॉ. मुस्तकीम काझी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
करजगी येथे प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय उभारल्यानंतर अक्कलकोट तालुक्याच्या ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना आरोग्य सेवांचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



