सोलापूर

“आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीला यश; गोकुळविरोधातील १८ दिवसांचे शेतकरी आंदोलन स्थगित”

"थकीत ऊस बिलासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; चार दिवसांत पैसे जमा करण्याचे आश्वासन"

“आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीला यश; गोकुळविरोधातील १८ दिवसांचे शेतकरी आंदोलन स्थगित”

“थकीत ऊस बिलासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; चार दिवसांत पैसे जमा करण्याचे आश्वासन”

सोलापूर : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने प्रशासन, कारखाना व्यवस्थापन आणि शेतकरी संघर्ष समिती यांच्यात झालेल्या चर्चेनंतर १६ जूनपर्यंत थकीत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

‘गोकुळ थकीत ऊस बिल शेतकरी संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट येथे बेमुदत आंदोलन सुरू होते. थकीत देयकांसाठी शेतकऱ्यांनी विविध प्रकारची आंदोलने छेडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

गेल्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र झाले होते. ४ जून रोजी शेकडो शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर १० जून रोजी कंबर तलाव परिसरात दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करत थकीत रकमेच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले होते. या आंदोलनामुळे जिल्हाभरात मोठी चर्चा रंगली होती.

आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये समन्वय साधला. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे तसेच कारखाना व्यवस्थापन यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस शहाजी पवार शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रतिनिधी अरविंद घोडके, अमोल पाटील, बसवराज नरे, बाळासाहेब मोरे, नेताजी खंडागळे यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनाकडून १६ जूनपर्यंत प्रति टन २,८०० रुपये दराने थकीत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच येत्या चार दिवसांत देयके अदा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण केली जाईल, असेही सांगण्यात आले.

या आश्वासनानंतर संघर्ष समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली. मात्र, ठरलेल्या मुदतीत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नावर तोडगा निघाल्याने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता १६ जूनपर्यंत प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन दिलेले आश्वासन पाळते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!