“सीईओ कुशल जैन यांचा बार्शीत अचानक धडक दौरा; विकासकामांची उघडकीस आली वास्तव स्थिती”
अचानक पाहणीमुळे अधिकाऱ्यांची धावपळ; प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश

“सीईओ कुशल जैन यांचा बार्शीत अचानक धडक दौरा; विकासकामांची उघडकीस आली वास्तव स्थिती”
अचानक पाहणीमुळे अधिकाऱ्यांची धावपळ; प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश
सोलापूर (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी रविवारी बार्शी तालुक्यात अचानक धडक देत विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या अनपेक्षित दौऱ्यामुळे स्थानिक प्रशासनात एकच खळबळ उडाली.

जैन यांनी पंचायत समितीपासून गावपातळीपर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा बारकाईने आढावा घेतला. विशेषतः पाणी पुरवठा योजनांवर त्यांनी लक्ष केंद्रीत करत नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी मिळते का, याची प्रत्यक्ष पडताळणी केली. काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटींवर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले.

ग्रामीण रस्ते विकासाच्या कामांची गुणवत्ता, कामांचा वेग आणि ठेकेदारांची जबाबदारी यावरही सीईओंनी कडक शब्दांत सूचना दिल्या. कामात ढिलाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देत औषधसाठा, डॉक्टरांची उपलब्धता आणि आरोग्य सेवांची गुणवत्ता याची सखोल तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी कमतरता आढळून आल्याने संबंधित यंत्रणेला त्वरित दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले.

या अचानक पाहणीमुळे प्रशासनातील निष्क्रियता उघड झाली असून, प्रलंबित कामांना गती देण्यासाठी हा दौरा निर्णायक ठरणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.




