महाराष्ट्र हळहळला! भीषण अपघातात नायब तहसीलदारांचा मृत्यू; कारचा चक्काचूर
एस कॉर्नरवर हायवा-कार समोरासमोर धडक; उपचारासाठी नेत असताना अधिकाऱ्यांचा मृत्यू, दोघे जखमी - अपघाताबाबत प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र हळहळला! भीषण अपघातात नायब तहसीलदारांचा मृत्यू; कारचा चक्काचूर
एस कॉर्नरवर हायवा-कार समोरासमोर धडक; उपचारासाठी नेत असताना अधिकाऱ्यांचा मृत्यू, दोघे जखमी – अपघाताबाबत प्रश्नचिन्ह
पुणे (प्रतिनिधी):- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडलेल्या भीषण अपघाताने प्रशासनासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. बनकरफाटा–जुन्नर मार्गावर झालेल्या या अपघातात नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय ५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपती फाट्याजवळील एस कॉर्नर या धोकादायक वळणावर हा अपघात घडला. गवारी हे त्यांच्या होंडा सिटी कारने बनकरफाट्याहून जुन्नरकडे जात होते. याचवेळी पांगरीमाथ्याकडून येणाऱ्या हायवा ट्रकशी त्यांच्या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. अपघातानंतर वाहन फिरून उलट दिशेला गेले. या भीषण अपघातात गवारी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यांना प्रथम ओतूर येथील निरामय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, पुढील उपचारासाठी पुण्याकडे नेत असताना गवारी यांनी वाटेतच अखेरचा श्वास घेतला.
या अपघातात,
विजय खारतोडे (४८) – गंभीर जखमी
तुषार भीमराव कोरडे (३५) – किरकोळ जखमी
दोघांवर उपचार सुरू असून, खारतोडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, अपघातातील हायवा ट्रक हा मांदारणे येथील ‘विघ्नहर्ता खडी केशर अँड पेवर्स’ या कंपनीचा असल्याचे समोर आले आहे.
• अपघात की निष्काळजीपणा? •
या भीषण अपघातानंतर स्थानिकांमध्ये विविध शंका उपस्थित होत आहेत:
वळणावर वेग जास्त होता का?
चालकाचे नियंत्रण सुटले का?
की रस्त्याच्या परिस्थितीमुळे अपघात घडला?
पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कर्तव्यदक्ष आणि जबाबदार अधिकारी म्हणून ओळख असलेल्या गवारी यांच्या निधनामुळे प्रशासनात आणि जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.



