सोलापूर

गरजूंना समाजकल्याण व दिव्यांग योजनांचा लाभ पोहोचविणार – सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते

जिल्हा परिषद समाजकल्याण समिती बैठकीत महत्त्वाचे निर्णय

गरजूंना समाजकल्याण व दिव्यांग योजनांचा लाभ पोहोचविणार – सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते

जिल्हा परिषद समाजकल्याण समिती बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सोलापूर,(प्रतिनिधी):- ग्रामीण भागातील गरीब, गरजू नागरिक, विद्यार्थी तसेच दिव्यांग बांधवांपर्यंत समाजकल्याण विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी केले.

जिल्हा परिषद सोलापूर येथील शिवरत्न सभागृहात आयोजित समाजकल्याण समितीच्या समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ. सुप्रिया गायकवाड, सौ. सिंधुताई आलदर, सौ. करुणा शिवशरण, सौ. सविता उंबरजे, कु. श्रुती भोरगुंडे, सौ. तेजस्वीनी बोराडे, सौ. शिवानी स्वामी, प्रशांत पाटील, नंदकुमार वाघमारे उपस्थित होते. तसेच प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी सर्व जिल्हा परिषद सदस्यांचा सभापती सौ. सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर समाजकल्याण विभागांतर्गत विविध योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला.

बैठकीत खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले,

• सन २०२५-२६ मधील २०% मागासवर्गीय कल्याण व ५% दिव्यांग कल्याण योजना यांना सन २०२६-२७ साठी मुदतवाढ

• सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकानुसार विविध योजनांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता

• अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या विकासासाठी काम बदल / वस्ती बदल प्रस्तावांना मंजुरी

• भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहासाठी जि.प. सेस २०२६-२७ मधून खर्चास मंजुरी

याशिवाय शिष्यवृत्ती, अनुसूचित वस्तीगृह, वृद्धाश्रम आणि वस्ती विकास योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

समता सप्ताहाचे जिल्हास्तरीय नियोजन उत्कृष्ट केल्याबद्दल सभापती सातपुते यांनी समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, कार्यालयीन अधीक्षक सचिन सोनकांबळे व इतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

तालुका स्तरावर आयोजित वक्तृत्व स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे नमूद करत, स्पर्धांचे व्हिडिओ व यशोगाथा तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

समता पंधरवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रसार झाला असून, जिल्हा स्तरावर ७ वी ते १२ वीतील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच भव्य बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

बैठकीत सदस्य सचिव व जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी विषयपत्रिकेवरील सर्व मुद्द्यांचा सविस्तर आढावा सादर केला. तसेच विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे व स्वाती गायकवाड यांनी योजना-निहाय माहिती सादर केली.

ही बैठक समाजकल्याण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान व प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली असून, गरजूंपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!