सकारात्मक अहवालासाठी एक लाखांची मागणी; उत्तर सोलापूरच्या मंडल अधिकाऱ्याला एसीबीचा दणका

सकारात्मक अहवालासाठी एक लाखांची मागणी; उत्तर सोलापूरच्या मंडल अधिकाऱ्याला एसीबीचा दणका
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात विहीर खोदकामातून निघालेल्या मुरूमाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या परवानगी प्रक्रियेत कथित लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. स्थळ पाहणी करून अनुकूल अहवाल देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तिचे मंडलचे मंडल अधिकारी विजयकुमार माने यांच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शेतीबरोबरच मुरूम वाहतुकीचा व्यवसाय करतात. बेलाटी येथील शेतातील विहीर खोदकामातून निघालेल्या मुरूमाच्या वाहतुकीसाठी आणि वापरासाठी परवानगी मिळावी म्हणून त्यांनी तहसीलदार, उत्तर सोलापूर यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जावर तहसीलदारांनी संबंधित जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मंडल अधिकारी विजयकुमार माने यांना दिले होते.
आरोपानुसार, जागेची पाहणी करून सकारात्मक अहवाल देण्यासाठी रॉयल्टी व्यतिरिक्त एक लाख रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची शासकीय पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान मंडल अधिकारी विजयकुमार माने यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरोधात सलगरवस्ती पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक २३०/२०२६ अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधीक्षक (एसीबी पुणे) शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक सुनील पाटील तसेच एसीबीच्या पथकाने केली.
दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारा एजंट शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.



