महाराष्ट्र

पंढरपुरात चार हजार सायकलस्वारांची दिंडी; क्रीडा प्राधिकरण संचालक पांडुरंग चाटे यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र-कर्नाटकातील सायकलस्वारांची नगरप्रदक्षिणा; 'फिट इंडिया'चा संदेश देत आषाढी वारीत आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम

पंढरपुरात चार हजार सायकलस्वारांची दिंडी; क्रीडा प्राधिकरण संचालक पांडुरंग चाटे यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र-कर्नाटकातील सायकलस्वारांची नगरप्रदक्षिणा; ‘फिट इंडिया’चा संदेश देत आषाढी वारीत आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरीत रविवारी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध भागांतून आलेल्या तब्बल चार हजार सायकलस्वारांनी पंढरपुरात भव्य सायकल दिंडी काढत वारकरी परंपरेप्रमाणे नगरप्रदक्षिणा केली. या उपक्रमामुळे पंढरीत भक्ती, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

 

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे संचालक पांडुरंग चाटे यांच्या हस्ते सायकल दिंडीचा शुभारंभ झाला. यावेळी आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनीही दिंडीत सहभागी होत सायकलस्वारांचे स्वागत केले.

आषाढी शुद्ध एकादशीचा मुख्य सोहळा २५ जुलै २०२६ रोजी होत असून, राज्यभरातून विविध पालख्या आणि दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सायकल संमेलनात हजारो सायकलस्वारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकरी संस्कृतीचा अनुभव घेतला.

 

‘फिट इंडिया’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून नियमित सायकलिंगचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संरक्षण आणि किफायतशीर वाहतुकीचा संदेश देण्यात आला. नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते, तसेच प्रदूषण कमी करण्यासाठीही सायकल हा प्रभावी पर्याय असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

राज्याच्या कानाकोपऱ्यासह कर्नाटकातून आलेल्या हजारो सायकलस्वारांमुळे पंढरपूरचे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते. नगरप्रदक्षिणेदरम्यान वारकरी परंपरेचे दर्शन घडवत सायकलस्वारांनी विठ्ठलनामाचा गजर केला.

 

या कार्यक्रमाला पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी हरीष बैजल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन पंढरपूर सायकल्स क्लब, नाशिक सायकल क्लब आणि बारामती सायकल क्लब यांनी संयुक्तपणे केले. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण उपक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!