राजकारण

सोलापूरसह १२ जिल्ह्यांत निवडणूक वातावरण; १२५ पंचायत समित्यांसाठी आचारसंहिता लागू होणार

सोलापूरसह १२ जिल्ह्यांत निवडणूक वातावरण; १२५ पंचायत समित्यांसाठी आचारसंहिता लागू होणार

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी येत्या मंगळवारनंतर आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग येण्याची शक्यता आहे.

आचारसंहिता लागू होणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील एकूण १२५ पंचायत समित्यांसाठी ही आचारसंहिता लागू होणार असून, निवडणूक प्रक्रियेची अधिकृत सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय निर्णय, उद्घाटन कार्यक्रम, निधी मंजुरी तसेच प्रचारात्मक जाहिरातींवर निर्बंध येणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला असून, उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि संघटनात्मक हालचाली वाढल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला मोठे महत्त्व असल्याने या निवडणुकांकडे सर्व पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर मतदानाची तारीख, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आणि मतमोजणीचा कालावधी स्पष्ट होणार आहे. आचारसंहिता लागू होताच प्रशासन सज्ज होणार असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!