सोलापुरात २५ डिसेंबरला मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन; परिसंवाद, मुलाखती व काव्यमैफलीची साहित्यिक मेजवानी
सोलापुरात २५ डिसेंबरला मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन; परिसंवाद, मुलाखती व काव्यमैफलीची साहित्यिक मेजवानी
सोलापूर (प्रतिनिधी) :- मनोरमा सोशल फाउंडेशन संचलित मनोरमा साहित्य मंडळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २५ डिसेंबर रोजी सोलापूर शहरात एकदिवसीय मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि विचारवंतांच्या सान्निध्यात सोलापूरकरांना समृद्ध साहित्यिक मेजवानी अनुभवता येणार आहे.

संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शोभा मोरे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत संमेलनाची सविस्तर माहिती दिली. हॉटेल बालाजी सरोवर येथील सदाशिवराव मोरे साहित्य संमेलन सभागृहात सकाळी ९.३० वाजता ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर लगेचच विश्वास पाटील यांची मुलाखत होणार असून ती अश्विनी कोळेकर घेणार आहेत.
दुपारच्या सत्रात ‘मराठी भाषा – महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. डॉ. राजशेखर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास सहभागी होणार आहेत.

संमेलनाच्या कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या काव्यमैफलीत राज्यभरातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत. यामध्ये राजन लाखे, अशोक भांडवलकर, माधव पवार, विमल माळी, डॉ. श्रुत्तीश्री वडकबाळकर, डॉ. मनीषा अतुल, डॉ. राधिका देशमुख, वंदना कुलकर्णी, गोविंद काळे, किरण येले, डॉ. स्मिता पाटील, अॅड. सुजाता जायव, स्वाती कुलकर्णी, मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले, कालिदास चवडेकर, बदिउज्जमा बिराजदार, इंद्रजीत घुले, निलोफर फणिबंद, शारदा तालीकोटी आदी कवी सहभागी होणार आहेत.
दुपारी १२.३० वाजता संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोरे यांची प्रकट मुलाखत होणार असून ती जयू भाटकर, शिल्पा देशपांडे व अश्विनी कोळेकर घेणार आहेत. यावेळी नागेश पवार व सहकारी श्रीकांत मोरे यांच्या निवडक कविता सादर करणार आहेत.
सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा ‘वर्षापूर्वी व आता’ या विषयावर आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांची प्रकट मुलाखत शिल्पा देशपांडे घेणार असून ते आपल्या गाजलेल्या कविता सादर करणार आहेत. तसेच ‘तणावविरहित जीवनशैली’ या विषयावर मृणालिनी मोरे, डॉ. तनुजा चिकने मालवंडी, डॉ. संदीप तांबारे, कविता अंधारे व संतोषी सुतार यांची व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती डॉ. ऋचा मोरे-पाटील यांनी दिली.

समारोप समारंभास कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी कामगार आयुक्त संभाजीराव काकडे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, पत्रकार संदीप काळे, डॉ. सुमित मोरे, आदिश पायगुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून नागेश पवार व सहकारी यांच्या भैरवीने संमेलनाचा समारोप होणार आहे.
पत्रकार परिषदेला संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोरे, कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड, मनोरमा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी मोहिते, मसाप जुळे-पश्चिम सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, ज्येष्ठ कवी गोविंद काळे, डॉ. शिवाजी शिंदे, मारुती कटकधोंड, बदिउज्जमा बिराजदार आदी उपस्थित होते.



