दिव्यांग ओळखपत्रात घोटाळा? वैद्यकीय तपासण्यावर सरकारची कडक नजर

दिव्यांग ओळखपत्रात घोटाळा? वैद्यकीय तपासण्यावर सरकारची कडक नजर
मुंबई (प्रतिनिधी):- दिव्यांग व्यक्तींना शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण, विविध शासकीय योजना, आर्थिक सवलती तसेच इतर शासकीय लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेले वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, अलीकडील काळात काही ठिकाणी बनावट अथवा चुकीच्या वैद्यकीय तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार उघडकीस आल्याने दिव्यांग कल्याण विभाग सतर्क झाला आहे.
या पार्श्वभूमीवर यूडीआयडी कार्ड जारी करण्यापूर्वी संबंधित दिव्यांग व्यक्तींच्या वैद्यकीय तपासणी अहवालांची सखोल पडताळणी संबंधित सक्षम संस्थेमार्फत करणे आवश्यक असल्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. अशा गैरप्रकारांमुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असून, त्यांचे हक्क डावलले जात असल्याची गंभीर बाब विभागाच्या निदर्शनास आली आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ, शैक्षणिक सवलती, नोकरीतील आरक्षण, प्रवास सवलती तसेच आर्थिक मदत या सर्व गोष्टी यूडीआयडी कार्डवर आधारित असल्याने या ओळखपत्राची विश्वासार्हता टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण, संशयास्पद किंवा नियमबाह्य वैद्यकीय अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मंजूर करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, बनावट कागदपत्रे सादर करून यूडीआयडी कार्ड मिळविणाऱ्या व्यक्तींवर तसेच अशा प्रकारच्या गैरप्रकारांना मदत करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिव्यांग कल्याण विभागाकडून देण्यात आला आहे. खऱ्या दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळावा आणि योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी ही पडताळणी प्रक्रिया अधिक कडक करण्यात येणार असल्याचे सचिव तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.



