महाराष्ट्र

दहावीच्या प्रश्नपत्रिका आता ऑनलाईन; परीक्षा केंद्रावरच होणार प्रिंट

पुरवणी परीक्षेत ऑनलाईन प्रणालीचा पहिला प्रयोग; पेपरफुटी आणि कॉपीला बसणार आळा

दहावीच्या प्रश्नपत्रिका आता ऑनलाईन; परीक्षा केंद्रावरच होणार प्रिंट

पुरवणी परीक्षेत ऑनलाईन प्रणालीचा पहिला प्रयोग; पेपरफुटी आणि कॉपीला बसणार आळा

सोलापूर :- दहावीच्या परीक्षांमधील कॉपीप्रकरणे, पेपरफुटी आणि प्रश्नपत्रिकांच्या गुप्ततेचा भंग रोखण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने पाठवून त्याच ठिकाणी प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. या नव्या प्रणालीचा पहिला प्रयोग आगामी दहावीच्या पुरवणी परीक्षेत करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

 

यामुळे प्रश्नपत्रिकांची वाहतूक, त्यासाठी लागणारा खर्च, वेळ आणि मध्येच पेपर फुटण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेष म्हणजे, परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच प्रश्नपत्रिका केंद्रावर उपलब्ध होणार असल्याने गुप्तता अधिक सुरक्षित राहणार आहे.

शिक्षण विभागाने यंदा पुरवणी परीक्षेतील दोन प्रश्नपत्रिकांसाठी ही ऑनलाईन प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रयोगाचे परीक्षण केल्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या मुख्य दहावी परीक्षांमध्ये ही पद्धत सर्व केंद्रांवर लागू करण्याचा विभागाचा मानस आहे.

सध्या प्रश्नपत्रिका छपाईपासून वाहतुकीपर्यंत अनेक टप्प्यांतून परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवल्या जातात. या प्रक्रियेत गुप्तता भंग होण्याची शक्यता कायम असते. काही ठिकाणी पेपरफुटी, कॉपी किंवा गैरप्रकार घडल्याच्या घटनांमुळे शिक्षण विभागावर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर आता तंत्रज्ञानाच्या मदतीने परीक्षा अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

नव्या प्रणालीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नियंत्रणाखाली राहणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे परीक्षा देण्याची सवय निर्माण होण्यासही या निर्णयामुळे मदत होणार असल्याचे मत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी व्यक्त केले.

*शिक्षणाधिकाऱ्यांचे मत*

“परीक्षा केंद्रावरच प्रश्नपत्रिकांची प्रिंट देण्याच्या निर्णयामुळे परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल. पुरवणी परीक्षेत दोन विषयांसाठी हा प्रयोग केला जाणार असून, त्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मुख्य परीक्षेत संपूर्ण प्रणाली लागू करण्याचा विचार आहे,” अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जात होती. आता ऑनलाईन प्रश्नपत्रिका प्रणालीमुळे अशा प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!