प्रशासकीय अनुभवाची नवी जबाबदारी; अरुण डोंगरे अमरावतीचे राज्य सेवा हक्क आयुक्त
स्वच्छ भारत अभियानात सोलापूरला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला होता

प्रशासकीय अनुभवाची नवी जबाबदारी; अरुण डोंगरे अमरावतीचे राज्य सेवा हक्क आयुक्त
स्वच्छ भारत अभियानात सोलापूरला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला होता
अमरावती :- प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता, प्रभावी निर्णयक्षमता आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी ओळख असलेले सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अरुण डोंगरे यांची ‘आयुक्त, राज्य सेवा हक्क, अमरावती’ या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे अमरावती विभागातील नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
अरुण डोंगरे यांचे अमरावती विभागाशी जुने आणि घट्ट नाते आहे.
७ जानेवारी १९९१ रोजी त्यांनी अमरावती विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर मंगरूळपीर, मूर्तिजापूर, दारव्हा आणि अचलपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे अमरावतीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपायुक्त (महसूल) म्हणूनही त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
अमरावती महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी ऑनलाइन बिल्डिंग परमिशन प्रणाली सुरू केली. या निर्णयामुळे बांधकाम परवानग्यांमधील विलंब कमी झाला आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यास मदत झाली. त्यांच्या या निर्णयाची त्या काळात राज्यभर चर्चा झाली होती.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवत सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. त्यांच्या या कामगिरीबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता.
नांदेडचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवून पाणीटंचाई कमी करण्यासाठी मोठे योगदान दिले. याच काळात त्यांनी कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीही जपली.
मुंबईतील म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी भाडेकरूंचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. भाडेकरूंना वेळेत भाडे मिळावे आणि पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच शिर्डी साईबाबा संस्थान आणि नागपूर फ्लाइंग क्लबमध्येही त्यांनी उल्लेखनीय प्रशासकीय कामगिरी बजावली आहे.
राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त म्हणून अरुण डोंगरे यांच्यावर आता शासनाच्या विविध सेवा नागरिकांना वेळेत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असेल. नागरिकांना दाखले, परवाने, प्रमाणपत्रे यांसारख्या सेवा निश्चित वेळेत मिळाल्या नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आयोगाला आहेत.
एखादा विभाग टाळाटाळ करत असल्यास नागरिक थेट आयोगाकडे दाद मागू शकणार असून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हे आयोगाचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.
प्रशासकीय अनुभव, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि लोककेंद्रित कामकाजासाठी ओळख असलेल्या अरुण डोंगरे यांच्या नियुक्तीमुळे अमरावती विभागात राज्य सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे



