सोलापूर

जलव्यवस्थापन योजनांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा; अध्यक्ष दीपक वैद्य यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

लघु पाटबंधारे, पाझर तलाव आणि गाव तलाव दुरुस्तीवर विशेष भर

जलव्यवस्थापन योजनांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा; अध्यक्ष दीपक वैद्य यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

लघु पाटबंधारे, पाझर तलाव आणि गाव तलाव दुरुस्तीवर विशेष भर

सोलापूर :- जिल्हा परिषद सोलापूरच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शिवरत्न सभागृहात पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध जलसंधारण आणि जलव्यवस्थापन योजनांच्या कामांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व योजनांची कामे जलद गतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्ष वैद्य यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, महिला व बालकल्याण सभापती सौ. अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाराम शिवमुर्ती, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती गीतांजली साळुंखे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती वंदना कांबळे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सन्मुखी कोरके, कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिश्चंद्र सपताळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या आर्थिक तसेच भौतिक प्रगतीचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये लघु पाटबंधारे योजनांतर्गत ० ते १०० सिंचन क्षमतेच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे, जिल्हा परिषद उपकर अंतर्गत पाझर तलाव व गाव तलाव दुरुस्तीची कामे, अटल भूजल योजना, जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना तसेच सन २०२५-२६ च्या आर्थिक आणि भौतिक प्रगती अहवालावर चर्चा करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाच्या कामांमध्ये कोणतीही हलगर्जी चालणार नसल्याचे स्पष्ट केले. “ग्रामीण भागातील शेती आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत,” असे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनीही विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत कामांमध्ये समन्वय राखण्याचे आवाहन केले. उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी ग्रामीण भागातील जलस्रोत मजबूत करण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे नमूद केले.

बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.० आणि अटल भूजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच सिंचन क्षमता वाढवण्यासाठी सुरू असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील जलसंधारण आणि सिंचन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रशासनाने सर्व योजनांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून आगामी काळात ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!