सर्पदंश व श्वानदंश लसींसाठी आणखी दीड कोटी निधीची मागणी करणार – सभापती चेतनसिंह केदार सावंत
प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सोलर सिस्टिमचे नियोजन करण्याचे निर्देश

सर्पदंश व श्वानदंश लसींसाठी आणखी दीड कोटी निधीची मागणी करणार – सभापती चेतनसिंह केदार सावंत
जि.प.सेसमधून ५० लाखांची तरतूद; आणखी निधीसाठी पाठपुरावा
सोलापूर :- जिल्हा परिषद सोलापूरच्या आरोग्य व शिक्षण समितीची महत्त्वपूर्ण सभा आज यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ग्रामीण आरोग्य सेवा, पाणी गुणवत्ता, सर्पदंश व श्वानदंश लसींची उपलब्धता तसेच आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत समितीच्या सदस्या सोनाली कडते, संगीता दुधाळ, शोभा खटकाळे, सविता कोकाटे, सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे तसेच सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार उपस्थित होते.

बैठकीत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी आरोग्य विभागाचा कारभार अधिक पारदर्शक पद्धतीने चालविण्याची आवश्यकता व्यक्त केली. “अधिकाऱ्यांना कोणत्याही अडचणी असतील तर त्या स्पष्टपणे मांडाव्यात. त्यावर योग्य मार्ग काढला जाईल,” असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील पाणी गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. “सध्या अनेक भागांत पाणीटंचाई आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वेळेत पाणी नमुन्यांची तपासणी होणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.

सर्पदंश व श्वानदंशाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लसींच्या उपलब्धतेचा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला. जि.प. सेसमधून यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगत सभापती केदार सावंत म्हणाले की, “ग्रामीण भागातील जनतेला वेळेत लस उपलब्ध व्हावी यासाठी आणखी १ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात भविष्यात सोलर सिस्टिम बसवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

याशिवाय जिल्ह्यातील अपंग मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले.
बैठकीदरम्यान सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी आरोग्य समितीच्या सभा वेळोवेळी तालुकास्तरावर घेण्याचा प्रस्तावही मांडला. तसेच गेल्या दोन वर्षांपासून विविध कामांच्या खर्चाची बिले प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांना समन्वयातून हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, जि.प. सेसच्या २०२६-२७ च्या ५१०.०८ लाख रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकास शिफारस मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आलेल्या मंजूर आराखड्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या बैठकीतील निर्णय महत्त्वाचे मानले जात असून आरोग्य विभागाला विविध विषयांवर स्पष्ट दिशा देण्यात आल्याचे दिसून आले.



