सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाचा निकाल ९१.३१ टक्के; मुलींची आघाडी कायम
मुलींनी पुन्हा मारली बाजी; सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९५.३२ टक्के

सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाचा निकाल ९१.३१ टक्के; मुलींची आघाडी कायम
मुलींनी पुन्हा मारली बाजी; सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९५.३२ टक्के
सोलापूर :- जिल्हा परिषद सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदा जिल्ह्याचा एकूण निकाल ९१.३१ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे मुलींनी पुन्हा एकदा उज्वल यश संपादन करत मुलांच्या तुलनेत अधिक निकालाची नोंद केली आहे.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा जिल्ह्यातून एकूण ६५ हजार ३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये ३५ हजार २४० मुले आणि २९ हजार ७६३ मुलींचा समावेश होता.
यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला ६४ हजार ३१५ विद्यार्थी बसले. त्यामध्ये ३४ हजार ८४६ मुले आणि २९ हजार ४६९ मुली होत्या. परीक्षेनंतर एकूण ५८ हजार ७२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये ३० हजार ६३६ मुले आणि २८ हजार ९१ मुलींचा समावेश आहे.
निकालाच्या टक्केवारीमध्ये मुलींनी आघाडी घेतली असून मुलांचा निकाल ८७.९१ टक्के तर मुलींचा निकाल तब्बल ९५.३२ टक्के लागला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९१.३१ टक्के नोंदविण्यात आला.
दरम्यान, इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता देखील जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेसाठी ३२१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ३६ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेसाठी १५४ महाविद्यालयांमध्ये १५ हजार २० जागा, तर कला शाखेसाठी ३४४ महाविद्यालयांमध्ये ३३ हजार ९८० जागांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एकूण जिल्ह्यात ८१९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ८५ हजार ३०० प्रवेश क्षमता उपलब्ध असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
हा निकाल जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी अधिकृत माहिती दिली असून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
*तालुकानिहाय निकाल खालीलप्रमाणे*
* अक्कलकोट – ८१.१२ टक्के
* बार्शी – ९४.७२ टक्के
* करमाळा – ९३.६५ टक्के
* माढा – ९२.३४ टक्के
* माळशिरस – ९१.८८ टक्के
* मंगळवेढा – ८७.६९ टक्के
* मोहोळ – ९१.३४ टक्के
* पंढरपूर – ९०.३६ टक्के
* सोलापूर शहर – ९२.०८ टक्के
* सांगोला – ९२.८५ टक्के



