“लोकांना झोपमोड करून पाणी नको”; पाणीपुरवठा सकाळीच करा – आ. सुभाष देशमुख
पाणी, रस्ते, ड्रेनेज आणि पथदिव्यांवर आमदार देशमुखांनी प्रशासनाला धारेवर धरले

“लोकांना झोपमोड करून पाणी नको”; पाणीपुरवठा सकाळीच करा – आ. सुभाष देशमुख
पाणी, रस्ते, ड्रेनेज आणि पथदिव्यांवर आमदार देशमुखांनी प्रशासनाला धारेवर धरले
सोलापूर :- शहरातील हद्दवाढ भागांमध्ये सुरू असलेल्या पाणीटंचाई, रात्री-अपरात्री होणारा कमी दाबाचा पाणीपुरवठा तसेच विविध नागरी समस्यांबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मंगळवारी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर आढावा घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी हद्दवाढ भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा बैठकीतील प्रमुख मुद्दा ठरला. अनेक भागांत अद्यापही मध्यरात्री किंवा पहाटे पाणीपुरवठा होत असून तोही कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब आमदार देशमुख यांनी निदर्शनास आणून दिली. “रात्री पाणी आल्यामुळे नागरिकांची झोपमोड होते. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पुढील काळात सकाळच्या वेळेत नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
प्रभाग क्रमांक १९ मधील हिमगिरी नगर, कामाक्षी नगर, अंबिका नगर, ईश्वर नगर आणि उद्धव नगर या भागांत अद्याप पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे तेथील नागरिकांना टँकर आणि बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या भागांत तातडीने टँकरद्वारे किंवा अन्य पर्यायी माध्यमांतून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
तसेच प्रभाग क्रमांक २६ मधील रेणुका नगर, प्रियंका नगर, प्रल्हाद नगर, पंचवटी नगर, सृष्टी नगर, रक्षक पार्क आणि सुभाष नगर येथे पाइपलाइन उपलब्ध असूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली. या भागांतील वितरण व्यवस्था तपासून नागरिकांना नियमित पाणी मिळेल यासाठी तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत शहरातील इतर नागरी समस्यांवरही सविस्तर चर्चा झाली. गॅस पाइपलाइन आणि ड्रेनेज कामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली. तसेच मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे, जुन्या आणि हँडओव्हर न झालेल्या सोसायट्यांमध्ये पथदिव्यांची व्यवस्था करणे, झोन कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
याशिवाय “रेन वॉटर हार्वेस्टिंग” संदर्भात शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, शहरातील मुख्य मार्गांवर दिशादर्शक फलक बसविणे, कल्याणनगर येथील स्टॉर्म वॉटर लाईनचे रखडलेले काम सुरू करणे आणि प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
पावसाळ्यापूर्वी नाला क्रमांक १३-अ आणि १४ येथील कामे पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच आसरा ब्रिज सीमांकन, नाट्यगृह प्रस्ताव, एनटीपीसी निधीतून मंजूर कामे तसेच डी-मार्ट ते विजापूर रोड आणि डी-मार्ट ते कुमठे रस्ता परिसरातील प्रलंबित विकासकामांना गती देण्याची मागणीही आमदार देशमुख यांनी केली.
“शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत आणि दर्जेदार स्वरूपात मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात,” असे निर्देश आमदार सुभाष देशमुख यांनी बैठकीत दिले.



