पंढरपूर ते तिरुपती आता थेट रेल्वेने; साप्ताहिक विशेष गाडीची सुविधा
वारकरी आणि बालाजी भक्तांसाठी रेल्वे प्रशासनाची खास भेट

पंढरपूर ते तिरुपती आता थेट रेल्वेने; साप्ताहिक विशेष गाडीची सुविधा
वारकरी आणि बालाजी भक्तांसाठी रेल्वे प्रशासनाची खास भेट
पंढरपूर (प्रतिनिधी):- विठ्ठल भक्त आणि तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पंढरपूर ते तिरुपती दरम्यान नवीन साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या गाडीमुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १७४३७ ‘तिरुपती-पंढरपूर साप्ताहिक’ ही रेल्वे दर शनिवारी सायंकाळी ४ वाजता तिरुपतीहून सुटणार असून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक १७४३८ ‘पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक’ ही रेल्वे दर रविवारी रात्री ८ वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता तिरुपती येथे पोहोचणार आहे.
ही रेल्वे मोडलिंब, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगिर, बीदर, जहीराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट, सिकंदराबाद, काचीगुडा, शादनगर, महबूबनगर, वनपर्ति रोड, गदवाल, कर्नूलु सिटी, डोन, गुत्ती, ताडीपत्रि, येर्रगुंटला, कडपा, राजमपेटा आणि रेणिगुंटा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांतील प्रवाशांना थेट प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी गाडीमध्ये एकूण २४ डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC 2-Tier), ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC 3-Tier), १४ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास तसेच २ गार्ड-कम-ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांपासून लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाची अपेक्षा असलेल्या प्रवाशांनाही सुविधा उपलब्ध होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या साप्ताहिक रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच गाडीचे सविस्तर वेळापत्रक आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी Indian Railways Enquiry Portal या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे सांगितले आहे. याशिवाय RailOne App आणि NTES App द्वारेही माहिती मिळू शकणार आहे



