सोलापूर

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘नो व्हेईकल डे’ सुरू

‘हे छोटे पाऊल, मोठा बदल घडवेल’; झेडपी प्रशासनाचा पर्यावरणपूरक संकल्प

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘नो व्हेईकल डे’ सुरू

‘हे छोटे पाऊल, मोठा बदल घडवेल’; झेडपी प्रशासनाचा पर्यावरणपूरक संकल्प

सोलापूर :- वाढते वायू प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, इंधनटंचाई आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे. आता दर सोमवारी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी खासगी वाहने न वापरता सायकल, सार्वजनिक वाहतूक, ई-वाहने किंवा पायी प्रवास करून कार्यालयात येणार आहेत. जिल्हा परिषद सोलापूरने प्रत्येक सोमवार हा ‘नो व्हेईकल डे’ म्हणून घोषित केला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी संयुक्तपणे या अभिनव उपक्रमाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी इंधन बचतीचे केलेले आवाहन आणि जागतिक पातळीवर वाढत असलेल्या पर्यावरणीय संकटाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांनुसार, ‘नो व्हेईकल डे’ दिवशी कोणत्याही पदाधिकारी, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहन कार्यालयात आणायचे नाही. तसेच शासकीय वाहनांचा अनावश्यक वापर टाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्याऐवजी बस, सायकल, ई-वाहन किंवा पायी प्रवासाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अध्यक्ष दीपक वैद्य यांनी सांगितले की, “पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. इंधन बचतीसाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी प्रत्येकाने छोटासा बदल स्वीकारण्याची गरज आहे. जिल्हा परिषद सोलापूरने या माध्यमातून समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.”

उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “प्रत्येक सोमवारी वाहनांचा वापर टाळल्यास इंधन बचतीसोबतच पर्यावरण संरक्षणाला हातभार लागेल. तसेच सायकल आणि पायी चालण्यास प्रोत्साहन मिळाल्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीलाही चालना मिळेल.”

‘हे छोटे पाऊल मोठा बदल घडवेल’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामागे इंधन बचत, पर्यावरण संरक्षण, प्रदूषणात कपात आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याचा उद्देश आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद सोलापूरच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, इतर शासकीय कार्यालयांनीही अशा प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “चला आपण सर्व मिळून देशहितासाठी छोटेसे योगदान देऊया,” असे आवाहनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!