सोलापूर

संत सावता महाराज मंदिराचे डिझाईन आठ दिवसांत अंतिम करा : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश

संत सावता महाराज मंदिराचे डिझाईन आठ दिवसांत अंतिम करा : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश

सोलापूर :- अरण येथील संत शिरोमणी श्री सावता महाराज स्मारक प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी तसेच मंदिराचे डिझाईन पुढील आठ दिवसांत अंतिम करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. राज्य शासनाने या स्मारकासाठी मंजूर केलेल्या 150 कोटी रुपयांच्या निधीपैकी 89 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता प्रत्यक्ष कामांना वेग देण्यावर भर देण्यात आला आहे.

नियोजन भवन येथील सभागृहात संत शिरोमणी श्री सावता महाराज स्मारक, जगद्गुरु महात्मा बसवेश्वर स्मारक आणि चोखामेळा स्मारकाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, माढा प्रांत अधिकारी जयश्री आव्हाड, मंगळवेढा प्रांत अधिकारी अमित माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिरासाठी आवश्यक जमीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जागा खरेदीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी. त्यानंतर मंदिर व इतर अनुषंगिक कामांसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी मंदिराच्या आराखड्याबाबत विशेष भर देत, “हे मंदिर भविष्यात राज्याच्या श्रद्धास्थानांपैकी एक ठरेल. त्यामुळे मंदिराचे डिझाईन भव्य, आकर्षक आणि विस्तीर्ण जागेवर उभारले गेले पाहिजे. या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे ठामपणे सांगितले.

दरम्यान, मंगळवेढा येथे उभारण्यात येणाऱ्या जगद्गुरु महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी प्रशासनाने 15 एकर जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या जागेवर भव्य स्मारक उभारण्यासोबतच परिसरातील तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशा सूचनाही पालकमंत्री गोरे यांनी दिल्या.

याच बैठकीत संत चोखामेळा स्मारकाचाही विषय चर्चिला गेला. मंगळवेढा शहरात दोन एकरपेक्षा अधिक जागा उपलब्ध होत असल्यास त्या जागेची जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि स्थानिक आमदारांनी संयुक्त पाहणी करून योग्य प्रस्ताव सादर करावा, असे आदेशही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिले.

संतांच्या स्मारकांमुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मतही बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकल्पांची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!