कर्मचारी चळवळीतील ज्येष्ठ नेते अरुणभाऊ क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता समितीवर नियुक्ती
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या नेतृत्वाला शासनाची दखल

कर्मचारी चळवळीतील ज्येष्ठ नेते अरुणभाऊ क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता समितीवर नियुक्ती
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या नेतृत्वाला शासनाची दखल
सोलापूर :- कर्मचारी चळवळ, सामाजिक बांधिलकी आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लढा देणारे कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष कार्तिकेयन यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले असून, या निवडीमुळे कर्मचारी व आंबेडकरी चळवळीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सक्रिय असलेले अरुणभाऊ क्षीरसागर हे 2007 पासून कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेमधील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सेवेत असताना अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाशी संघर्ष करत संघटनेला बळकटी दिली.
त्यांच्या उल्लेखनीय सेवाकार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून त्यांना “गुणवंत कर्मचारी पुरस्कार” प्रदान करण्यात आला होता. याशिवाय राज्यस्तरीय अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक, संघटनात्मक आणि कर्मचारी चळवळीतील योगदानाचा आढावा घेणारा “संघर्ष योद्धा” हा विशेष गौरवांक देखील प्रकाशित करण्यात आला होता.
विशेष म्हणजे सेवानिवृत्तीनंतरही अरुणभाऊ क्षीरसागर यांनी कर्मचारी चळवळीपासून दूर न जाता पूर्णवेळ समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. कास्ट्राईब संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत त्यांना संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कायम ठेवले आहे. त्यांच्या प्रयत्नांतून जिल्हा परिषद आवारात संघटनेचे स्वतंत्र कार्यालय उभे राहिले असून, आजही त्या कार्यालयातून कर्मचारी प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला जात आहे.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनेही संघटनात्मक कार्याबद्दल त्यांना “जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आता जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर झालेली त्यांची नियुक्ती ही त्यांच्या दीर्घकालीन संघर्ष, प्रामाणिक कार्यपद्धती आणि सामाजिक बांधिलकीची पोचपावती मानली जात आहे.
या नियुक्तीनंतर जिल्हा परिषदेमधील अधिकारी, कर्मचारी, कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून अरुणभाऊ क्षीरसागर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. “कर्मचारी हक्कांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान आहे,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.



