राम सातपुतेंच्या जनसंपर्काचा वारसा पुढे; संस्कृतीताई सातपुते यांचा ‘जनता दरबार’ चर्चेत
जिल्हा परिषद राजकारणात नवा पायंडा; दहिगावमध्ये सर्वसामान्यांसाठी खुले व्यासपीठ
राम सातपुतेंच्या जनसंपर्काचा वारसा पुढे; संस्कृतीताई सातपुते यांचा ‘जनता दरबार’ चर्चेत
जिल्हा परिषद राजकारणात नवा पायंडा; दहिगावमध्ये सर्वसामान्यांसाठी खुले व्यासपीठ
माळशिरस :- माळशिरस विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेसाठी थेट संवादाचे माध्यम ठरलेला ‘जनता दरबार’ आता नव्या स्वरूपात पुन्हा चर्चेत आला आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी सुरू केलेल्या जनसंपर्काच्या परंपरेला पुढे नेत दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा समाज कल्याण सभापती संस्कृतीताई राम सातपुते यांनी दहिगाव येथे जनता दरबाराचे आयोजन केले आहे. या उपक्रमामुळे माळशिरस तालुक्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे.
बुधवार, दि. 13 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता दहिगाव येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारामध्ये नागरिकांच्या सार्वजनिक तसेच वैयक्तिक अडचणी ऐकून त्यांचे तातडीने निवारण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या राजकीय इतिहासात अशा प्रकारचा जनता दरबार प्रथमच आयोजित होत असल्याची चर्चा परिसरात आहे.
माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या कार्यकाळात जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी ‘जनता दरबार’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवली होती. अनेक सर्वसामान्य नागरिकांनी या माध्यमातून शासकीय कामे, वैयक्तिक अडचणी, महसूल, वीज, पाणी, रस्ते यांसारखे प्रश्न मार्गी लावले होते. त्यामुळे जनता दरबार हा माळशिरस मतदारसंघात विश्वासाचे व्यासपीठ ठरला होता.
आता त्याच पावलावर पाऊल ठेवत संस्कृतीताई राम सातपुते यांनीही लोकांशी थेट संपर्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी दहिगाव गटातील गावभेटी, वाड्या-वस्त्यांवरील भेटी आणि नागरिकांशी संवादातून अनेक प्रश्न जाणून घेतले होते. त्याच अडचणींच्या निवारणासाठी आता जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांना थेट व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.
“लोकप्रतिनिधी जनतेच्या दारी आणि जनतेचे प्रश्न थेट प्रशासनापर्यंत” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवला जात असल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे. विशेषतः महिलांपासून शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आपली समस्या मांडण्याची संधी मिळणार असल्यामुळे या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
माळशिरस तालुक्यात गेल्या काही वर्षांत लोकसंपर्काच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सातपुते परिवाराचा हा उपक्रम आगामी काळात जिल्हा परिषद राजकारणात नवा ट्रेंड ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



