राजकारण

मोहोळ-वळसंग महामार्गाच्या ७४० कोटी निधीवरून श्रेयवाद; आ. कल्याणशेट्टींचा खासदार प्रणिती शिंदेंवर निशाणा

देवेंद्र कोठेंना कल्याणशेट्टींचा सल्ला; "प्रणिती ताईंवर बोलताना संयम ठेवा"

मोहोळ-वळसंग महामार्गाच्या ७४० कोटी निधीवरून श्रेयवाद; आ. कल्याणशेट्टींचा खासदार प्रणिती शिंदेंवर निशाणा

देवेंद्र कोठेंना कल्याणशेट्टींचा सल्ला; “प्रणिती ताईंवर बोलताना संयम ठेवा”

सोलापूर :- मोहोळ ते वळसंग राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर झालेल्या तब्बल ७४० कोटी रुपयांच्या निधीवरून सोलापूरच्या राजकारणात श्रेयवाद रंगला असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फैर सुरू झाली आहे. भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर थेट टीका करत, “हा निधी आमदार सुभाष देशमुख आणि आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मंजूर झाला असून खासदार प्रणिती शिंदे आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा दावा केला.

गुरुवारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस पक्ष आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मोहोळ ते वळसंग राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर झालेल्या ७४० कोटी रुपयांच्या निधीवरून सुरू असलेल्या श्रेयवादावर बोलताना त्यांनी “हा निधी आमदार सुभाष देशमुख आणि आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मंजूर झाला असून आता काँग्रेसकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप केला.

मोहोळ-वळसंग राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर झालेला निधी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे मिळाल्याचा दावा करत आ. कल्याणशेट्टी म्हणाले, “सुभाष बापूंचे गडकरी साहेबांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी चार वेळा पत्रव्यवहार केला, तर मी स्वतः तीन पत्रं दिली. ज्या दिवशी गडकरी साहेबांकडून मंजुरीचा ई-मेल आला, त्याच दिवशी मलाही पत्र मिळालं. त्यामुळे या कामासाठी आमचा पाठपुरावा निर्णायक ठरला.”

खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधताना ते म्हणाले, “प्रणिती ताईंबद्दल मला फारसं बोलायचं नाही. त्या पत्रकार परिषद घेऊन बोलतील, तेव्हा मी त्यांना उत्तर देईन. पण त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान देतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुलेआम म्हणतात की कोणताही नेता समोर येऊ द्या, मी डिबेटला तयार आहे. मग प्रणिती ताई एवढ्या मोठ्या नेत्या कधीपासून झाल्या? त्यांना काय बोलायचं, कुठे बोलायचं याचं भान राहिलेलं नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधत, “देशात राहुल गांधी काँग्रेस पक्ष संपवत आहेत आणि सोलापुरात तेच काम प्रणिती शिंदे करत आहेत,” असे वक्तव्य केले.

आमदार देवेंद्र कोठे यांचाही उल्लेख करताना आ. कल्याणशेट्टी म्हणाले, “देवेंद्र कोठे यांनी प्रणिती शिंदेंना उत्तर दिलं, पण कोठे साहेब अजून लहान आहेत. त्यांनी प्रणिती ताईंवर बोलताना थोडा संयम ठेवावा,” असा सल्लाही त्यांनी दिला. हा टोला पत्रकार परिषदेत विशेष चर्चेचा विषय ठरला.

प्रणिती शिंदे यांनी महामार्गासाठी पाठपुरावा केल्याच्या दाव्यावर बोलताना आ. कल्याणशेट्टी म्हणाले, “ज्या वेळी या रस्त्याची वर्कऑर्डर निघाली, त्यानंतर त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला. कोणीतरी त्यांना सांगितलं की काम मंजूर झालं आहे, मग त्यांनी पत्र दिलं. आता त्या या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.”

डीपीडीसी निधीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले, “ज्यांना साध्या डीपीडीसी निधीसाठी आंदोलन करावं लागतं, उपोषणाला बसावं लागतं, ते ७००-८०० कोटींचा निधी आणल्याचा दावा कसा करू शकतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील विविध रस्त्यांच्या उद्घाटन आणि लोकार्पणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे १४ मे रोजी अक्कलकोट दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यांचा अधिकृत दौरा लवकरच जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहोळ-वळसंग महामार्गाच्या मंजुरीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला श्रेयवाद आता अधिकच तीव्र झाला असून आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!