तहानलेल्या जिल्हा परिषदेसाठी इंद्रजीत पवार सरसावले; आरओ व वॉटर कुलर दुरुस्तीचे आदेश
दैनिक प्रबुद्ध राजच्या बातमीची दखल; उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे तातडीचे निर्देश

तहानलेल्या जिल्हा परिषदेसाठी इंद्रजीत पवार सरसावले; आरओ व वॉटर कुलर दुरुस्तीचे आदेश
दैनिक प्रबुद्ध राजच्या बातमीची दखल; उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे तातडीचे निर्देश
सोलापूर : ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना विविध पाणीपुरवठा योजनांद्वारे दिलासा देणारी सोलापूर जिल्हा परिषद स्वतःच्या मुख्यालयात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी खासगी जारवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यालयातील आरओ यंत्रणा बंद पडणे, प्रवेशद्वाराजवळील दोन्ही वॉटर कुलर नादुरुस्त अवस्थेत असणे आणि नागरिकांना पिण्यासाठी जारवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे कर्मचारी, शेतकरी व नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.

सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालयात दररोज ग्रामीण भागातून शेकडो शेतकरी, ग्रामस्थ, कर्मचारी आणि अधिकारी विविध कामांसाठी येत असतात. मात्र, मुख्यालयात स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा नियमित उपलब्ध नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे अनेकदा जार संपल्यानंतर नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारीदेखील समोर आल्या होत्या. उन्हाच्या तीव्रतेत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय होत होती.

या संदर्भातील वृत्त दैनिक प्रबुद्ध राजमध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी प्रशासकीय शाखेचे शाखा अभियंता चेतन वाघमारे यांना तातडीने आदेश देत मुख्यालयातील नादुरुस्त आरओ यंत्रणा आणि वॉटर कुलर त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था उभी करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

“मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये. नादुरुस्त सुविधा त्वरित सुरू करून नागरिकांची गैरसोय थांबवावी,” असे आदेश उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
“ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारी यंत्रणाच स्वतः पिण्याच्या पाण्यासाठी जारवर चालत असेल, तर ही गंभीर बाब आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद मुख्यालयातील ‘जार संस्कृती’ बंद होणार का, नागरिकांना नियमित आरओचे शुद्ध पाणी मिळणार का आणि बंद पडलेल्या सुविधा पुन्हा सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



