सिईओ कुशल जैन यांच्या नावाने फेक नंबर सक्रिय
नागरिकांनी सावध राहावे; संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नये
सिईओ कुशल जैन यांच्या नावाने फेक नंबर सक्रिय
नागरिकांनी सावध राहावे; संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नये
सोलापूर (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नावाचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीकडून बनावट मोबाईल नंबरवरून नागरिकांना मेसेज पाठविले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित नंबर हा फेक असून त्याचा अधिकृत कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हिएतनाम देशाच्या कोडसह (+84) सुरू होणाऱ्या या क्रमांकावरून “Hello, how are you doing? Where are you at the moment?” अशा स्वरूपाचे संदेश पाठविले जात आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून सायबर फसवणुकीचा धोका वाढला आहे.
प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या अनोळखी किंवा संशयास्पद नंबरवरून येणाऱ्या मेसेजला कोणत्याही परिस्थितीत उत्तर देऊ नये. तसेच संबंधित नंबर तात्काळ ब्लॉक करून सायबर फसवणूक म्हणून रिपोर्ट करावा.
सायबर गुन्हेगार अनेकदा अधिकारी, बँक कर्मचारी किंवा शासकीय व्यक्तींच्या नावाचा वापर करून नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मोबाईलवर येणारे अनोळखी कॉल, लिंक किंवा मेसेज याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन*
* अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवर विश्वास ठेवू नका.
* कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
* OTP, बँक माहिती किंवा लोकेशन पाठवू नका.
* संशयास्पद नंबर तात्काळ ब्लॉक करा.
* सायबर हेल्पलाईनकडे तक्रार नोंदवा.
सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहून अशा बनावट नंबरपासून सावध राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



