जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेटची मुदतवाढ
राज्यातील वाहनधारकांना दिलासा; आता ३० जून २०२६ पर्यंत बसविता येणार उच्च सुरक्षा नंबर प्लेट

जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेटची मुदतवाढ
राज्यातील वाहनधारकांना दिलासा; आता ३० जून २०२६ पर्यंत बसविता येणार उच्च सुरक्षा नंबर प्लेट
मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यातील जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी शासनाने वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी HSRP प्लेट बसविण्याची मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ होती.
ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात HSRP बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर अनेक वाहनधारकांची प्रक्रिया अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP ही विशेष तंत्रज्ञानावर आधारित नंबर प्लेट असून वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र शासनाने ही प्रणाली लागू केली आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील सर्व जुन्या वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करून आगाऊ वेळ निश्चित करणे आवश्यक आहे. ३० जून २०२६ पूर्वी HSRP बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहनधारकांनी कोणत्याही एजंट किंवा अनधिकृत व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, असा इशाराही परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. केवळ शासनमान्य अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करून HSRP प्लेट बसवून घ्याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, येत्या काळात सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट अनिवार्य होणार आहे.



