दहिगावमध्ये संस्कृतीताई सातपुते यांच्या ‘जनता दरबाराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांच्या समस्या थेट ऐकून तातडीच्या प्रश्नांवर जागेवर निर्णय; माळशिरस तालुक्यात उपक्रमाची जोरदार चर्चा

दहिगावमध्ये संस्कृतीताई सातपुते यांच्या ‘जनता दरबाराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांच्या समस्या थेट ऐकून तातडीच्या प्रश्नांवर जागेवर निर्णय; माळशिरस तालुक्यात उपक्रमाची जोरदार चर्चा
माळशिरस (प्रतिनिधी) :- माळशिरस तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी थेट संवादाचे प्रभावी व्यासपीठ ठरलेल्या ‘जनता दरबार’ उपक्रमाला पुन्हा एकदा नवे स्वरूप मिळाले आहे.
दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी दहिगाव येथे आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच महिलांपासून शेतकरी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

दहिगाव येथील हनुमान मंदिर परिसरात पार पडलेल्या या जनता दरबारात नागरिकांच्या सार्वजनिक तसेच वैयक्तिक अडचणी शांतपणे ऐकून घेण्यात आल्या. पाणी, रस्ते, वीज, महसूल, शासकीय कागदपत्रे, पेन्शन, सामाजिक योजनांचा लाभ अशा अनेक प्रश्नांवर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

माजी आमदार राम सातपुते यांनी सुरू केलेल्या जनसंपर्काच्या परंपरेला पुढे नेत संस्कृतीताई सातपुते यांनी हा उपक्रम राबविल्याने तालुक्यात या जनता दरबाराची विशेष चर्चा रंगली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील अंतर कमी करून “जनतेचे प्रश्न थेट प्रशासनापर्यंत” पोहोचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे समर्थकांनी सांगितले.

यावेळी बोलताना संस्कृतीताई सातपुते यांनी सांगितले की, “संवादातून समस्यांचे निराकरण” हीच या उपक्रमामागची भूमिका आहे. प्रत्येक नागरिकाचा प्रश्न संवेदनशीलतेने ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हेच पुढील कामाची प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनता दरबारामध्ये अनेक तक्रारींवर तत्काळ संबंधित विभागांशी संपर्क साधून कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधी थेट गावात येऊन प्रश्न ऐकत असल्याचे स्वागत केले.
माळशिरस तालुक्यात गेल्या काही वर्षांत लोकसंपर्काच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सातपुते परिवाराचा हा उपक्रम आगामी काळात जिल्हा परिषद राजकारणात नवा पायंडा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



