सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत आज वादळी सभा; बदल्या, पाणीटंचाई, महायुतीतील नाराजीसह आरोग्याचा मुद्दा गाजणार

औषध साठा, वैद्यकीय नियोजनाचा अजेंड्यावर साधा उल्लेखही नाही; अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या नेतृत्वाची पहिली परीक्षा

सोलापूर जिल्हा परिषदेत आज वादळी सभा; बदल्या, पाणीटंचाई, महायुतीतील नाराजीसह आरोग्याचा मुद्दा गाजणार

औषध साठा, वैद्यकीय नियोजनाचा अजेंड्यावर साधा उल्लेखही नाही; अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या नेतृत्वाची पहिली परीक्षा

सोलापूर :- सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सभागृहाची पहिली विशेष व सर्वसाधारण सभा आज (दि. १५ मे) दुपारी २ वाजता होत असून, या पहिल्याच सभेत अनेक संवेदनशील आणि वादग्रस्त मुद्द्यांवरून मोठा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच सभा असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांसह नव्याने निवडून आलेल्या सदस्यांसाठीही ही पहिलीच अधिकृत सभा असल्याने सभागृहातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

सभेच्या अजेंड्यावर विकासकामे, निधी मंजुरी, रस्ते, अंगणवाडी, दिव्यांग योजना, हातपंप साहित्य खरेदी, ई-बाईक योजना यांसारखे विषय असले तरी सर्वाधिक चर्चा मात्र आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाची होत आहे. लाखो वारकरी काही दिवसांत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार असताना आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय पथके, उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना, साथीच्या रोगांवरील नियंत्रण, आपत्कालीन आरोग्य सेवा याबाबतचा एकही विषय सभेच्या ११ मुद्द्यांमध्ये नसल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरवर्षी आषाढी यात्रेदरम्यान ताप, उलट्या, जुलाब, उष्माघात, पाणीजन्य आणि संसर्गजन्य आजारांची मोठ्या प्रमाणावर नोंद होत असते. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर औषध खरेदी आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असते. मात्र यंदा आरोग्य विभागाने औषध खरेदीचा प्रस्तावच वेळेत सभेपुढे आणला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित विषयाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सदस्य आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या बदलीनंतर नव्याने डॉ. सतीश कोपूरवाड यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर औषध खरेदीसंबंधीची प्रक्रिया मंदावल्याची चर्चा आहे. औषध भांडार विभागाकडून आवश्यक प्रस्ताव वेळेत पुढे न गेल्याने संपूर्ण प्रक्रिया रखडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी, औषध भांडार विभाग, संबंधित फार्मासिस्ट आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सभेत काही सदस्यांकडून याबाबत लक्षवेधी सूचना मांडल्या जाण्याची शक्यता असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सभेत गाजणारा दुसरा मोठा मुद्दा म्हणजे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या. गट-क आणि गट-द संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण आणि विनंती बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि अन्याय झाल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. बदल्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याने कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या तक्रारी मांडल्या होत्या. त्यामुळे पहिल्याच सभेत प्रशासनाला या मुद्द्यावरून घेरण्याची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.

याशिवाय जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर केलेल्या ‘नो व्हेईकल डे’ निर्णयावरूनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. वाढते प्रदूषण आणि इंधन बचतीच्या उद्देशाने प्रत्येक सोमवारी वाहनविरहित दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी नुकत्याच झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन भवन परिसरात शेकडो चारचाकी वाहनांची गर्दी झाल्याने या निर्णयाची खिल्ली उडाली होती. अध्यक्ष एसटीने, उपाध्यक्ष सायकलने आणि कर्मचारी सार्वजनिक वाहनाने प्रवास करतील, अशी घोषणा प्रत्यक्षात कितपत राबवली जात आहे, यावरून विरोधक प्रशासनाला लक्ष्य करू शकतात.

महायुतीमधील अंतर्गत नाराजीही सभेत उफाळून येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सदस्य सत्तावाटपावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. विषय समित्यांच्या सभापती पदांमध्ये अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याने काही सदस्यांमध्ये अस्वस्थता असून त्याचे पडसाद सभेत उमटण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागातील पाणीटंचाई, अपूर्ण पाणीपुरवठा योजना, उन्हाळ्यातील टँकर व्यवस्थापन, सेस बजेट आणि विविध विकासकामांचा रखडलेला वेग हे विषयही सभेत गाजण्याची शक्यता आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या पहिल्याच सभेत प्रशासनाची कार्यपद्धती, आरोग्य विभागाची निष्क्रियता, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील गोंधळ आणि महायुतीतील अंतर्गत धुसफूस यामुळे वातावरण चांगलेच तापण्याचे संकेत मिळत आहेत.

जिल्हा परिषद सदस्यांची ही पहिलीच सभा असल्याने अनेक सदस्य आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आजची सभा केवळ औपचारिक मंजुरीपुरती मर्यादित न राहता प्रशासनाला धारेवर धरणारी आणि नव्या सत्ताधाऱ्यांच्या नेतृत्वाची पहिली मोठी परीक्षा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!