सोलापूर

डॉ. आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीत दिले आश्वासन, पण वाचनालय अद्याप सुरू नाही

समता पर्व संपले, रंगरंगोटीही झाली; तरी आंबेडकर वाचनालयाचे कुलूप कायम

डॉ. आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीत दिले आश्वासन, पण वाचनालय अद्याप सुरू नाही

समता पर्व संपले, रंगरंगोटीही झाली; तरी आंबेडकर वाचनालयाचे कुलूप कायम

सोलापूर :- संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात “समता सप्ताह” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समता, शिक्षण आणि ज्ञानाचा संदेश देणाऱ्या या सप्ताहादरम्यान जिल्हा परिषद परिसरातील “डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय” सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अनेक आश्वासने, बैठका, पाठपुरावा आणि तयारीनंतरही हे वाचनालय आजपर्यंत सुरू झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या बाजूलाच असलेले “डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय” आजही कुलूपबंद असून, आतमधील पुस्तके धूळ खात पडल्याचे चित्र आहे.

• समता सप्ताहात घोषणा, पण प्रत्यक्षात शांतता •

समता सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वाचनालय नव्या स्वरूपात सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनीही सातत्याने पाठपुरावा करत “लवकरच वाचनालय सुरू होईल” असे स्पष्ट आश्वासन दिले होते.

याच काळात कास्ट्राईब कर्मचारी संघटनेनेही या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करून वाचनालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

समाजातील विद्यार्थी, अभ्यासक आणि वाचन संस्कृती जपणाऱ्या नागरिकांसाठी हे वाचनालय महत्त्वाचे ठरेल, या भूमिकेतून विविध सामाजिक संघटना आणि कर्मचारी संघटनांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली.

वाचनालयाची रंगरंगोटी, स्वच्छता, दुरुस्ती आणि अंतर्गत व्यवस्था पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. अभ्यासिका दालन देखील सज्ज करण्यात आले. अनेक वर्षे धूळ खात पडलेली पुस्तके व्यवस्थित लावण्यात आली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, ग्रामीण भागातील युवक आणि वाचनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतरही वाचनालयाचे दरवाजे अद्याप बंदच असल्याने आता नागरिक उघडपणे प्रश्न विचारू लागले आहेत.

“जर सर्व कामे पूर्ण झाली असतील, तर वाचनालय सुरू करण्यास विलंब का?”
“ज्ञानाचे दालन खुले करण्यासाठी प्रशासन आणखी किती दिवस घेणार?”

असे सवाल आता जिल्हा परिषद प्रशासनाला विचारले जात आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. खासगी वाचनालयांचे वाढते शुल्क आणि शांत अभ्यासिकेचा अभाव यामुळे जिल्हा परिषद वाचनालय त्यांच्यासाठी मोठा आधार ठरू शकतो.

विशेषतः ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना या वाचनालयाचा मोठा फायदा होणार आहे. अभ्यासासाठी आवश्यक संदर्भ पुस्तके, वर्तमानपत्रे आणि अभ्यासिका उपलब्ध झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला परिवर्तनाचे सर्वात मोठे शस्त्र मानले. त्यांच्या नावाचे वाचनालयच बंद राहणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” अशी भावना सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने या विषयावर सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वाचनालय सुरू करण्यासाठी लढा देत आहोत. आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात निर्णय होत नाही.”

• आता लक्ष सीईओ कुशल जैन आणि सभापती संस्कृती सातपुते यांच्या निर्णयाकडे •

दरम्यान, आता जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते हे या प्रश्नावर नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समता पर्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि सामाजिक समतेच्या घोषणा यांचा खरा अर्थ कृतीतून दिसणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने उद्घाटनाची तारीख जाहीर करून वाचनालय सर्वसामान्यांसाठी खुले करावे, अशी जोरदार मागणी आता होत आहे.

सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्षात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय” सुरू करून विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना आणि वाचन संस्कृतीला मोठा आधार द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

ज्ञान, समता आणि शिक्षणाचा संदेश देणारे हे वाचनालय प्रत्यक्षात सुरू होणे, हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या १३५ व्या जयंतीला खरी मानवंदना ठरेल, अशी भावना आता अधिक तीव्र होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!