पालखी महामार्गामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखकर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पालखी महामार्गाची पाहणी; रखडलेली कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश

पालखी महामार्गामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखकर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पालखी महामार्गाची पाहणी; रखडलेली कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश
सोलापूर (प्रतिनिधी):- संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी, “पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखकर झाला असून सोलापूर जिल्ह्यातील आध्यात्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे,” असे प्रतिपादन केले.

या पाहणी दौऱ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यसिंह मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख समाधान आवताडे अभिजीत पाटील, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, रणजीतसिंह मोहिते पाटील, राम सातपुते यांच्यासह जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी विजया पांगारकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, अभिजीत औटी तसेच विविध अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट या धार्मिक स्थळांकडे जाणारे रस्ते यापूर्वी अत्यंत खराब अवस्थेत होते. त्यामुळे वारकरी आणि भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. “वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला असून त्यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीचा ताण कमी होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

*’आईची इच्छा पूर्ण झाली’*
यावेळी भावनिक होत गडकरी म्हणाले, “या भागातील रस्ते चांगले व्हावेत, अशी इच्छा माझ्या आईने व्यक्त केली होती. पांडुरंगाच्या आणि आईच्या आशीर्वादाने मला हे काम करण्याची संधी मिळाली.”
पालखी महामार्गाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती देत गडकरी यांनी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. काही ठिकाणची रखडलेली कामे डिसेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. वाखरी ते पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाच्या काही परवानग्या प्रलंबित असून त्याबाबत तातडीने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक विहिरीचे जतन आणि संवर्धन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विशेष रचना करून करण्यात आले आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीचेही संवर्धन करण्यात आले असून या दोन्ही ठिकाणांची पाहणी गडकरी यांनी केली.
दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
पालखी महामार्गामुळे सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन, वाहतूक व्यवस्था आणि ग्रामीण भागातील संपर्क अधिक मजबूत होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



