सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची नाराजी

गावांना पाणी देणारी जिल्हा परिषद स्वतःच ‘जार’च्या भरवशावर!

सोलापूर जिल्हा परिषदेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची नाराजी

गावांना पाणी देणारी जिल्हा परिषद स्वतःच ‘जार’च्या भरवशावर!

सोलापूर :- ग्रामीण भागातील विकासकामांचे नियोजन करणारी आणि “मिनी मंत्रालय” म्हणून ओळख असलेली सोलापूर जिल्हा परिषद सध्या स्वतःच्या मुख्यालयातील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेमुळे चर्चेत आली आहे. रोज शेकडो कर्मचारी, अधिकारी, शेतकरी आणि ग्रामीण भागातून आलेले नागरिक विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत येतात. मात्र, या नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी ‘जार’वर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कोट्यवधी रुपयांचे बजेट असलेली आणि आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त जिल्हा परिषद ग्रामीण भागात लाखो रुपयांच्या पाणीपुरवठा योजना राबवते. मात्र, स्वतःच्या कार्यालयात नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात अपयश येत असल्याची चर्चा सुरू आहे.

जिल्हा परिषदेत स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था, बोअरवेल आणि पाणी थंड करण्यासाठी वॉटर कुलरची सुविधा उपलब्ध आहे. तरीदेखील पिण्यासाठी खासगी जार मागवले जात असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकदा जार संपल्यानंतर कर्मचारी आणि नागरिकांना पाण्यावाचून थांबावे लागत असल्याची तक्रारही समोर आली आहे.

विशेष म्हणजे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना थंड पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोरील पोर्चमध्ये दोन वॉटर कुलर बसविण्यात आले होते. मात्र हे दोन्ही वॉटर कुलर सध्या नादुरुस्त अवस्थेत असून बंदच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत कामासाठी येणाऱ्या शेतकरी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

काही दिवसांपूर्वी बसविण्यात आलेली आरओ यंत्रणादेखील बंद किंवा नादुरुस्त झाल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच उभारण्यात आलेली यंत्रणा एवढ्या कमी कालावधीत बंद कशी पडली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

यापूर्वीही जिल्हा परिषदेमधील सुविधांबाबत तक्रारी समोर आल्या होत्या. सभागृहातील वातानुकूलित यंत्रणेमधून पाणी गळत असल्याने तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य आणि विद्यमान सभापती अमृता वाघे यांचे आसन बदलावे लागल्याची घटना घडली होती. तसेच पत्रकार कक्षातील पाण्याच्या जारमध्ये किटक आढळल्याने पत्रकारांनीही नाराजी व्यक्त केली होती.

 

दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप नसले तरी मूलभूत सुविधांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. “ग्रामीण खेड्यापाड्यात जनतेला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जर स्वतःच पिण्याच्या पाण्यासाठी जारवर अवलंबून असेल, तर ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

ग्रामीण भागातून रोज मोठ्या अपेक्षेने जिल्हा परिषदेत येणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना किमान स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!