राजकारण

उपमहापौरपद म्हणजे राजकीय ग्रहणच? पालकमंत्री कोणाच्या गळ्यात अडकवणार ही ‘माळ’?

उपमहापौरपद म्हणजे राजकीय ग्रहणच? पालकमंत्री कोणाच्या गळ्यात अडकवणार ही ‘माळ’?

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर पदाची निवड यंदा केवळ औपचारिक राजकीय प्रक्रिया न राहता, ती थेट सत्ता, भवितव्य आणि राजकीय अस्तित्वाशी जोडली गेली आहे. उपमहापौरपदाची माळ अखेर कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्णयाबाबत मोठे सस्पेन्स निर्माण झाले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, स्थायी समिती, परिवहन समिती आणि इतर प्रभावी समित्यांसाठी नगरसेवकांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू असताना, उपमहापौरपदासाठी मात्र कोणीही उत्सुक नसल्याचे चित्र समोर आले आहे. राजकीय वर्तुळात यामागे एकच शब्द वापरला जातोय — “राजकीय ग्रहण.”

सोलापूर महापालिकेच्या राजकीय इतिहासाकडे पाहिले असता, उपमहापौरपदाशी जोडलेला एक कटू योगायोग सतत चर्चेत राहिला आहे. आतापर्यंत उपमहापौर झालेल्या बहुतांश नगरसेवकांना पुढील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दिलीप कोल्हे, नाना काळे, प्रमोद गायकवाड, लालसिंग राजपूत, हारून सय्यद, प्रविण डोंगरे, विष्णू निकंबे पैलवान यांसारखे प्रभावी नेते उपमहापौरपद भूषवूनही पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळेच सध्याचे नगरसेवक उपमहापौरपद स्वीकारण्याबाबत साशंक असल्याची चर्चा रंगली आहे.

महापौर आणि उपमहापौर ही पदे जरी शहराच्या दृष्टीने सर्वोच्च मानली जात असली, तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या प्रशासनावर आणि निर्णय प्रक्रियेवर ज्याचे नियंत्रण असते, ते पद म्हणजे स्थायी समिती सभापती.

स्थायी समिती सभापतीकडे कोट्यवधी रुपयांचे बजेट, विकासकामांचे टेंडर, निधीचे वाटप, तसेच महत्त्वाच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार असतात. त्यामुळेच या पदाला राजकीय भाषेत ‘सुपर महापौर’ असे संबोधले जाते.

कोणता प्रकल्प मार्गी लागणार, कोणता रखडणार, शहराचा विकास कुठल्या दिशेने जाणार – हे सर्व मोठ्या प्रमाणावर स्थायी समितीच्या निर्णयांवर अवलंबून असते.

महापौर हे शहराचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात, तर उपमहापौर हे त्यांचे सहकारी असतात. मात्र अधिकारांच्या बाबतीत ही पदे बऱ्याच अंशी औपचारिक असल्याची भावना नगरसेवकांमध्ये आहे. त्यामुळेच अनेक नेते उपमहापौरपदापेक्षा स्थायी समिती सभापती पदासाठी आग्रही असल्याचे स्पष्ट चित्र सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे नेमकी कोणाची निवड स्थायी समिती सभापती आणि नेमकी उपमहापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत शहरात तीव्र चर्चा सुरू आहे. काही नागरिक तर उघडपणे असा सवाल उपस्थित करत आहेत की, उपमहापौर पदाची माळ घालून “पालकमंत्री कोणाचा राजकीय प्रवास संपवणार?”

उपमहापौरपद हे सन्मानाचे की राजकीय अडचणीचे, आणि स्थायी समिती सभापतीपद कोणाच्या हाती जाणार, यावर सोलापूर महानगरपालिकेतील सत्तासमीकरण अवलंबून आहे. येत्या काही दिवसांत या निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला जाणार, हे मात्र नक्की.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!