“न्यायमूर्तीप्रमाणे वकिलांनाही प्रशिक्षण? बाबासाहेबांच्या नावाने उभं राहिलं पहिलंच ट्रेनिंग सेंटर”….पण कुठे ?

“न्यायमूर्तीप्रमाणे वकिलांनाही प्रशिक्षण? बाबासाहेबांच्या नावाने उभं राहिलं पहिलंच ट्रेनिंग सेंटर”….पण कुठे ?
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक नवा आणि महत्त्वाचा अध्याय जोडला गेला आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या पुढाकारातून तळोजा, नवी मुंबई येथे स्थापन करण्यात आलेल्या देशातील पहिल्याच ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (BBATRC) चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले.

या ऐतिहासिक प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “ही वास्तू केवळ एक प्रशिक्षण केंद्र न राहता भारतातील वकिली क्षेत्राचा दिशादर्शक ठरेल” असा विश्वास व्यक्त केला. न्यायमूर्तींसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमी असताना, वकिलांसाठी अशी अकॅडमी का नव्हती, हा प्रश्न आज बार कौन्सिलने प्रत्यक्ष कृतीतून सोडवला आहे, अशा शब्दांत त्यांनी बार कौन्सिलचे कौतुक केले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, कायद्याचे सैद्धांतिक शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील (कोर्ट क्राफ्ट) दरी भरून काढण्याचे काम हे केंद्र करणार आहे. नवोदित वकिलांना व्यावसायिक कौशल्य, संशोधन आणि आधुनिक न्यायप्रणालीची सखोल समज देण्यासाठी BBATRC अत्यंत मोलाचे ठरणार आहे.
या केंद्राचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर यांनी भूषविले.

या वेळी व्यासपीठावर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती न्या. रेवती मोहिते-डेरे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲड. अनिल सी. सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता ॲड. देविदास पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आधुनिक न्यायव्यवस्थेच्या चौकटीत पुढे नेणारे हे केंद्र भविष्यात हजारो वकिलांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा सूर संपूर्ण सोहळ्यात जाणवत होता.

वकिली क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि नव्या पिढीच्या सक्षम घडणीसाठी BBATRC हे केंद्र देशभरात आदर्श ठरणार असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



