पद्म पुरस्कार 2026 जाहीर; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण

पद्म पुरस्कार 2026 जाहीर; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण
महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा गौरव
नवी दिल्ली (प्रतिनिधी) :- देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार 2026 ची घोषणा आज केंद्र सरकारकडून करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार, उद्योग, वैद्यकीय क्षेत्र आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी देशभरातील 131 मान्यवरांना यंदाचे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा समावेश असून, राज्याला यंदा एक पद्म विभूषण, तीन पद्म भूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2026 साठी देशभरातून 5 पद्म विभूषण, 13 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 19 महिला, 6 परदेशी/अनिवासी भारतीय तसेच 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान देण्यात आला आहे.
*धर्मेंद्र यांना सर्वोच्च सन्मान*
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी मरणोत्तर ‘पद्म विभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या सन्मानामुळे चित्रपटसृष्टीसह चाहत्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
*पद्म भूषण – महाराष्ट्रातील मान्यवर*
पद्म भूषण पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तीन मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
अलका याज्ञिक – कला (पार्श्वगायन)
श्री. पीयूष पांडे – जाहिरात क्षेत्र (मरणोत्तर)
श्री. उदय कोटक – व्यापार व उद्योग (बँकिंग क्षेत्र)
*पद्मश्री – महाराष्ट्रातील 11 मान्यवर*
पद्मश्री पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील 11 व्यक्तींची निवड झाली असून विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेण्यात आली आहे.
क्रीडा:
रोहित शर्मा – क्रिकेट
वैद्यकीय क्षेत्र:
श्रीमती आर्मिडा फर्नांडिस
समाजसेवा:
श्री. जनार्दन बापूराव बोथे
कृषी:
श्री. श्रीरंग देवाबा लाड
कला:
भिकल्या लाडक्या धिंडा
माधवन रंगनाथन
रघुवीर तुकाराम खेडकर
सतीश शाह (मरणोत्तर)
व्यापार व उद्योग:
अशोक खाडे
सत्यनारायण नुवाल
विज्ञान व अभियांत्रिकी:
जुझेर वासी




या सर्व मान्यवरांना येत्या मार्च–एप्रिल 2026 दरम्यान राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
पद्म पुरस्कारांच्या घोषणेमुळे महाराष्ट्रासह देशभरातून सर्व पुरस्कारार्थींवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यामुळे देशाचा गौरव अधिक उंचावल्याची भावना व्यक्त होत आहे.



