झेंडावंदनावेळी पीएसआय मोहन जाधव यांना हृदयविकाराचा झटका….
झेंडावंदनावेळी पीएसआय मोहन जाधव यांना हृदयविकाराचा झटका….
उमरगा (प्रतिनिधी):- देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच उमरगा येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. राज्य उत्पादन शुल्क विभागात उमरगा येथे कार्यरत असलेले दुय्यम निरीक्षक (पीएसआय) मोहन भीमा जाधव यांचे कर्तव्य बजावत असतानाच आकस्मिक निधन झाले.
आज २६ जानेवारी रोजी सकाळी उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू होता. सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित असताना झेंडावंदन सुरू असतानाच मोहन भीमा जाधव यांना अचानक चक्कर आली. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (अटॅक) आल्याने ते तोल जाऊन खाली कोसळले. खाली पडताना त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला, ज्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली.
उपस्थित सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण कार्यालय परिसरात शोककळा पसरली.
विशेष म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच मोहन भीमा जाधव यांना पीएसआय म्हणून पदोन्नती मिळाली होती. त्याआधी ते सोलापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात कर्तव्य बजावत होते. दीर्घ सेवा आणि अनुभव असलेले जाधव हे शांत, संयमी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
ते केवळ अधिकारीच नव्हते, तर एक उत्तम माणूस आणि मार्गदर्शक म्हणूनही सर्वांच्या मनात स्थान मिळवून होते. त्यांच्या सहकाऱ्यांच्या आठवणींनुसार, “दररोज सकाळी वॉकिंग झाल्यानंतर आम्ही विजापूर येथील स्वामी कॅन्टीनवर एकत्र बसून चहा पीत असू. ते आमच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारत, साधेपणाने संवाद साधत. ते मला केवळ सहकारी नाही, तर मित्रासारखे, मोठ्या भावासारखे आणि मार्गदर्शक होते.”
त्यांच्या अकाली निधनामुळे उत्पादन शुल्क विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार व नागरिकांकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.
कर्तव्यावर असताना देशाच्या प्रजासत्ताक दिनीच आलेला हा मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावणारा ठरला आहे.
मोहन भीमा जाधव यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



