प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख नाही; वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्या विरोधात जाहीर निषेध

प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख नाही; वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्या विरोधात जाहीर निषेध
नाशिक (प्रतिनिधी):- देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना नाशिक येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित अधिकृत समारंभात वादाची ठिणगी पडली. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यामुळे वन विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने पालकमंत्री मा. गिरीश महाजन यांच्याविरोधात जाहीर निषेध नोंदवला, यामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
संबंधित महिला कर्मचाऱ्याने प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “२६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधान लागू झाले आणि त्यामुळेच आपण प्रजासत्ताक आहोत. ज्या महामानवाने दिवसरात्र परिश्रम घेऊन हे संविधान देशाला दिले, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करणे हे प्रत्येक घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचे कर्तव्य आहे.”
महिला कर्मचाऱ्याने पालकमंत्र्यांच्या भाषणावर थेट टीका करत, “तुमच्या जातीवादामुळे, पक्षीय विचारधारेमुळे किंवा वैयक्तिक विचारसरणीमुळे तुम्ही बाबासाहेबांचे नाव टाळले असेल, तरी एक भारतीय नागरिक म्हणून मी याचा निषेध करते,” असे ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मीडियाशी देणंघेणं नाही. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. १५ ऑगस्टला भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख नसलातरी चालेल, पण २६ जानेवारीला बाबासाहेबांशिवाय प्रजासत्ताक होऊच शकत नाही. तुम्ही पालकमंत्री असो किंवा अधिकारी—आपण सगळे बाबासाहेबांमुळेच आहोत.”
या वक्तव्यांनंतर काही काळ पोलीस परेड मैदानावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणामुळे प्रजासत्ताक दिन, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबतचा संवेदनशील मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अनेक नागरिकांनी महिला कर्मचाऱ्याच्या भूमिकेचे समर्थन करत, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचा उल्लेख होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.



