महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात संत तुकाराम महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे भक्तिभावाने नेतृत्व

सराटी येथे पादुका पूजन, जेसीबीतून पुष्पवृष्टी; अकलूजच्या रिंगण सोहळ्याने हजारो वारकऱ्यांना भक्तिरसाचा अविस्मरणीय अनुभव

सोलापूर जिल्ह्यात संत तुकाराम महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे भक्तिभावाने नेतृत्व

सराटी येथे पादुका पूजन, जेसीबीतून पुष्पवृष्टी; अकलूजच्या रिंगण सोहळ्याने हजारो वारकऱ्यांना भक्तिरसाचा अविस्मरणीय अनुभव

पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या **जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात सराटी-अकलूज येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे तसेच पालखीतील अश्वांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनीही स्वागत सोहळ्यात सक्रिय सहभाग घेत वारकऱ्यांसाठी उभारलेल्या विविध सुविधांची पाहणी केली.

नीरा नदीवरील पूल ओलांडून पालखी रथाने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या माध्यमातून रथावर भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘विठ्ठल… विठ्ठल…’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

पादुका पूजनानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पालखीचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. यानंतर त्यांनी पालखी रथाचे सारथ्य करत वारकऱ्यांमध्ये मिसळून भक्तिभावाची अनोखी परंपरा जपली. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

यापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांनी पालखी सोहळ्याची सूत्रे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द केली. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे सोपवल्या.

स्वागत सोहळ्यास पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, पंचायत समिती सभापती मदनसिंह मोहिते पाटील, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, सुमित शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ यांच्यासह सोलापूर व पुणे जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

स्वागतस्थळी संध्याताई तिवाडी व त्यांच्या पथकाने सादर केलेल्या भारूडाने वारकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या सोहळ्याला मराठी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री शिवानी परब आणि संजना काळे यांनीही उपस्थिती लावली.

*वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य; जिल्हाधिकारी आणि सीईओंकडून सुविधांची पाहणी*

पालखी स्वागतस्थळी वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विविध सुविधांची जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, निवारा केंद्रे, आरोग्य उपचार केंद्र, मुख्यमंत्री आरोग्य रथ, हिरकणी कक्ष तसेच पालखी सोबत कार्यरत आरोग्य बाईक सेवेसह विविध सुविधांचा हजारो वारकरी लाभ घेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

*अकलूजच्या रिंगण सोहळ्याने भक्तीचा महासागर उसळला*

दरम्यान, अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या भव्य मैदानावर पार पडलेला पारंपरिक रिंगण सोहळा हजारो भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. अश्वांच्या रिंगणाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा निनाद, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष आणि भक्तीच्या वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने उपस्थित हजारो वारकरी आणि अकलूजकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!