अर्ज छाननीदरम्यान गेटवरच वाद; काँग्रेस-शिवसेना नेत्यांचा पोलिसांशी जोरदार वाद
अर्ज छाननीदरम्यान गेटवरच वाद; काँग्रेस-शिवसेना नेत्यांचा पोलिसांशी जोरदार वाद
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान आज मोठा गोंधळ उडाला. छाननी स्थळी प्रवेशावरून काँग्रेस व शिवसेना नेते आणि पोलिस प्रशासनामध्ये जोरदार वादावादी झाली. काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी उमेदवारांसोबत आलेल्या वकिलांना गेटवरच पोलिसांनी आत प्रवेश देण्यास मज्जाव केला. यावर आक्षेप घेत शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी पोलिसांना जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये ‘तू तू मैं मैं’ सुरू झाल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.
नेत्यांनी सांगितले की, निवडणूक नियमांनुसार उमेदवारांना कायदेशीर सल्ल्यासाठी वकील उपस्थित ठेवण्याचा अधिकार आहे. मात्र पोलिसांकडून कोणतीही स्पष्ट माहिती न देता प्रवेश रोखण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणला जात असल्याचा आक्षेप यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने वरिष्ठांच्या आदेशानुसारच प्रवेश नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. छाननी प्रक्रियेदरम्यान गर्दी होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मर्यादित प्रवेश देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आजच्या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेदरम्यान तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



