निवडणुकीत फेसबुक-व्हॉट्सअॅपवर पोस्ट केली तर नोकरी जाऊ शकते! शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा थेट इशारा
निवडणुकीत फेसबुक-व्हॉट्सअॅपवर पोस्ट केली तर नोकरी जाऊ शकते! शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा थेट इशारा
नाशिक (प्रतिनिधी):- निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचा वापर करताना शासकीय कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा कडक इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. राजकीय स्टेटस, पोस्ट, रील्स, लाईक, शेअर किंवा कमेंट केल्यास ती बाब आचारसंहिता उल्लंघन मानली जाऊ शकते आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आचारसंहिता लागू असताना सरकारी सेवकांनी पूर्णतः राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रचार केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबन, विभागीय चौकशी तसेच गंभीर प्रकरणात नोकरीवरून बडतर्फीपर्यंतची कारवाई होऊ शकते.
निवडणूक काळात काही शासकीय कर्मचारी आपल्या ओळखीच्या नेत्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सक्रिय होत असल्याचे चित्र दिसते. मात्र सरकारी सेवक म्हणून कोणत्याही उमेदवाराची बाजू घेणे, प्रचार करणे किंवा समर्थन दर्शवणे पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), व्हॉट्सअॅप स्टेटस व ग्रुप्सवर प्रशासनाची 24 तास डिजिटल नजर आहे. खालील प्रकार अप्रत्यक्ष प्रचार मानले जातात –
राजकीय पोस्टला लाईक करणे
पोस्ट शेअर करणे
कमेंट करून समर्थन दर्शवणे
उमेदवाराचा फोटो डीपी किंवा कव्हर फोटो ठेवणे
राजकीय आशयाचे स्टेटस टाकणे
या सर्व बाबींवर कारवाई होऊ शकते.
आचारसंहितेचे उल्लंघन सिद्ध झाल्यास पुढील कारवाई केली जाऊ शकते – कारणे दाखवा नोटीस,विभागीय चौकशी
निलंबन,गंभीर स्वरूपात नोकरीवरून बडतर्फी
हे नियम फक्त कायमस्वरूपी शासकीय कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसून, कंत्राटी, मानधनावर काम करणारे व आउटसोर्स कर्मचारी यांनाही तितकेच लागू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जर कोणता शासकीय कर्मचारी राजकीय प्रचार करताना आढळून आला, तर नागरिक –
जिल्हा निवडणूक अधिकारी
तहसीलदार / प्रांताधिकारी
निवडणूक आयोगाचे C-Vigil अॅप
अधिकृत हेल्पलाईन क्रमांक
याठिकाणी तक्रार दाखल करू शकतात.
🔹 आचारसंहितेतील महत्त्वाचे मुद्दे
* कोणत्याही पक्षाच्या समर्थनार्थ पोस्ट किंवा स्टेटस निषिद्ध
* उमेदवाराच्या प्रचारात थेट सहभागास बंदी
* सभा, रॅली, प्रचार फेरीत उपस्थिती मनाई
* शासकीय वाहन, साधनसामग्री वापरण्यास बंदी
* राजकीय तटस्थता पाळणे अनिवार्य
याबाबत मनपाचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले की, “शासकीय सेवकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालीवर प्रशासनाचे लक्ष असून, नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल.”



