मुंबई (प्रतिनिधी) :- येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभरात आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीत ई-चलान प्रकरणांची तडजोड स्वीकारली जाणार नाही, अशी अधिकृत माहिती अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आली आहे.
सन २०२५ पासून राज्यातील प्रलंबित ई-चलान प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वाहतूक विभागाकडून महाराष्ट्र राज्य विधी आणि सेवा प्राधिकरणाच्या मंजुरीने प्रयत्न चालू आहेत. मात्र आगामी लोकअदालतीत ई-चलान प्रकरणांचा समावेश करण्यात येणार नाही, हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दरम्यान, काही यूट्यूब चॅनल्स, इंस्टाग्राम पेजेस तसेच इतर सामाजिक माध्यमांवर १३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान दंडात सवलत मिळणार असल्याचा चुकीचा व दिशाभूल करणारा प्रचार होत असल्याचे वाहतूक विभागाच्या तपासात आढळून आले आहे. या खोट्या प्रचारामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचा धोका असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांसाठी सूचना
* ई-चलान तडजोड किंवा दंडात सवलत याबाबत सोशल मीडियावरील पोस्ट, जाहिराती किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये.
* कोणत्याही अधिकृत नसलेल्या लिंक किंवा अॅपद्वारे ई-चलानची रक्कम भरू नये.
* ई-चलान संदर्भातील अधिकृत माहिती मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस किंवा अधिकृत सरकारी पोर्टलवरूनच तपासणी करावी.
जर एखाद्या नागरिकाचे ई-चलान प्रकरण स्थानिक जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाने तडजोडीसाठी निश्चित केले असेल, तर संबंधित न्यायालय किंवा स्थानिक वाहतूक पोलीस कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारव्दाज यांनी कळविले.
वाहतूक विभागाची विनंती आहे की, नागरिकांनी अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीची खात्री करूनच कोणत्याही प्रकारचा व्यवहार करावा. तसेच समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीकडे दुर्लक्ष करून सुरक्षित डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.

More Stories
माळढोक अभयारण्यात वन विभागाची धडक कारवाई; मुरूम उपशात वापरलेली टिपर व जेसीबी जप्त
शिवरस्ता मोजणी प्रकरणात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; भूमी अभिलेख अधिकारी दीड लाखांची लाच घेतांना अटक
जातीवाचक शिवीगाळ, खंडणी प्रकरणात आरोपी निर्दोष — सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाचा निर्णय