Prabuddha Raj

Latest Marathi News

“भांडवलशाही नव्हे, मानवी प्रतिष्ठेला केंद्रस्थानी ठेवणारी अर्थव्यवस्था ही डॉ. आंबेडकरांची देणगी”- प्रा.एम.आर. कांबळे

Oplus_16908288

सोलापूर (प्रतिनिधी) :- “आज जगभर व्यवहारात असलेली बाजारपेठाभिमुख अर्थव्यवस्था मुठभर श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गाच्या हिताची ठरते, मात्र गरीब, वंचित आणि श्रमिकांच्या मूलभूत सन्मान व हक्कांचे रक्षण करणारी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा विचार जगात प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला,” असे मत प्रा. एम.आर. कांबळे यांनी व्यक्त केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि कास्ट्राइब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे यशवंतराव चव्हाण सभागृहात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना प्रा. कांबळे म्हणाले की, “डॉ. आंबेडकरांना परदेशी उच्च पदस्थ नोकऱ्यांची संधी असतानाही त्यांनी त्या नाकारल्या आणि वकीली व्यवसाय करत आयुष्यभर वंचित, शोषित आणि समाजातील सर्व दुर्बल घटकांच्या न्यायासाठी संघर्ष केला. आजचा संविधानिक अधिकार, सामाजिक न्याय आणि आर्थिक समानतेवर आधारित राष्ट्रनिर्मितीचा पाया त्यांनीच घातला.”

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पांजली अर्पण करून झाली.

या अभिवादन कार्यक्रमात कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, कास्ट्राइब जि.प. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षिरसागर, राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, स्वीय सहाय्यक नदाफ तसेच समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.