Prabuddha Raj

Latest Marathi News

इंदू मिल स्मारकाचे 50% काम पूर्ण; पुढील महापरिनिर्वाण दिनी लोकार्पण – मुख्यमंत्री फडणवीसांचा आत्मविश्वास

Oplus_16908288

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला मोठी गती मिळाली असून, सध्या एकूण 50% काम पूर्ण झाले आहे. जर पुढील कामे नियोजित वेगाने पार पडली, तर येत्या पुढील महापरिनिर्वाण दिनी या ऐतिहासिक स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कालपासून मुंबईतील चैत्यभूमीवर भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थित राहून आंबेडकरांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांनी स्मारकाच्या प्रगतीबाबत महत्त्वाची माहिती दिली.

इंदू मिलमधील हा प्रकल्प केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वास्तू म्हणून उभारण्यात येत आहे. या स्मारकात 100 फूट उंच पायथ्यावर 350 फूट उंचीचा कांस्य धातूचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे.
पुतळ्यासाठी लागणाऱ्या सुमारे 6,000 टन पोलादापैकी 1,400 टन सामग्री साइटवर पोहोचली आहे.
650 टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले असून, पॅनेल कास्टिंगचे कामही अंतिम टप्प्यात आहे. पुतळ्याच्या बुटांचे कांस्य पॅनेल तयार झाले असून त्यावरील लेस आणि टेक्श्चर अत्यंत सूक्ष्म पद्धतीने कोरले आहे.

स्मारक परिसरातील अनेक महत्त्वपूर्ण स्ट्रक्चरल कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. यामध्ये,प्रवेशद्वार इमारत,संशोधन केंद्र,वाचनालय,भव्य प्रेक्षागृह,वाहनतळ या सर्वांची आतील सजावट सध्या सुरू असून बाह्य विकास कामेही गतिमान आहेत. पुतळा संघर्ष समितीच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने नव्याने समन्वय समिती स्थापन केली आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी पुतळ्याचा ढांचा उभा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.“ज्या समाजात मानवतेचा अधिकारही नाकारला जात होता, त्या काळात बाबासाहेबांनी विषमतेला शक्ती बनवून ज्ञान संपादन केले, समाज जागृत केला आणि जगातील सर्वोत्तम संविधान दिले.”

ते पुढे म्हणाले की, जगातील प्रगत राष्ट्रेही जे करू शकली नाहीत, तेव्हा बाबासाहेबांनी देशासाठी राष्ट्रीय वीज ग्रीडची कल्पना साकारली.

सरकारी यंत्रणा, समित्या आणि अभियंत्यांच्या समन्वयातून सुरू असलेल्या या कामाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी आशावाद व्यक्त करत सांगितले की  “सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले तर पुढच्या महापरिनिर्वाण दिनी हे भव्य स्मारक जनतेसाठी खुले करू.”

हे स्मारक पूर्ण झाल्यानंतर ते जगातील सर्वात उंच मानवतावादी विचारवंताच्या स्मारकांपैकी एक ठरणार आहे.