पंचवार्षिक निवडणुकांचा प्रभाव : गजबजलेली जिल्हा परिषद आज पडली ओस

पंचवार्षिक निवडणुकांचा प्रभाव : गजबजलेली जिल्हा परिषद आज पडली ओस
सोलापूर (प्रतिनिधी) :- पंचवार्षिक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दररोज नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेली सोलापूर जिल्हा परिषद आज शांत व ओस पडलेली दिसून आली. निवडणूक प्रचार, बैठका आणि व्यवस्थापन यामध्ये नागरिक, लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते व्यस्त असल्यामुळे जिल्हा परिषद परिसरातील नेहमीची गर्दी लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सामान्यतः विविध शासकीय कामे, तक्रारी, विकासकामांचा पाठपुरावा आणि प्रशासकीय कामकाजासाठी मोठ्या संख्येने नागरिक जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थित असतात. मात्र सध्या निवडणूक प्रक्रियेच्या धामधुमीमुळे जनतेचे लक्ष राजकीय घडामोडींवर केंद्रित झाल्याने कार्यालयीन कामकाज सुरू असतानाही नागरिकांची उपस्थिती कमी झालेली दिसून येत आहे. परिणामी, जिल्हा परिषद परिसरात तुलनेने शांतता जाणवत आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना नव्याने निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभासदांच्या कक्षांची रंगरंगोटी, दुरुस्ती तसेच स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. संपूर्ण जिल्हा परिषद इमारत स्वच्छ, सुस्थितीत व चकाचक ठेवण्यावर भर दिला जात असून नव्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यारंभासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासन करत आहे.
या कामांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम स्वतः घेत असून कामे नियोजनबद्ध, गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होत आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. आवश्यक त्या सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयात पुन्हा पूर्वीसारखीच नागरिकांची वर्दळ वाढेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.



