सोलापुरात धक्कादायक घटना; नामांकित उद्योजकाची १७व्या मजल्यावरून उडी घेऊन जीवनयात्रा समाप्त

सोलापुरात धक्कादायक घटना; नामांकित उद्योजकाची १७व्या मजल्यावरून उडी घेऊन जीवनयात्रा समाप्त
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापुरातील विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने शहर हादरले आहे. मुलतानी बेकरीचे मालक व स्थानिक व्यावसायिक सुनील सदारंगानी (वय ५९) यांनी सतराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दुपारी सुमारे चार वाजता घडली.
घटनेनुसार, सदारंगानी हे पनाश अपार्टमेंटच्या सतराव्या मजल्यावर जाऊन दुपारी अचानक त्यांनी १७व्या मजल्यावरून खाली उडी घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली आणि अपार्टमेंटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
माहितीनुसार, सदारंगानी हे होटगी रोड परिसरात ‘मुलतानी बेकरी’ या नावाने प्रसिद्ध बेकरी व्यवसाय चालवत होते. एकेकाळी ‘मुलतानी ब्रेड’ हा ब्रँड सोलापुरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होता. मात्र काही वर्षांपूर्वी बेकरी व्यवसाय बंद पडल्याने त्यांना आर्थिक व वैयक्तिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ते काही दिवसांपासून तणावाखाली असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणाची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.




