स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांचा संताप उसळला – ९ फेब्रुवारीला मुंबईत धडक मोर्चा

स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांचा संताप उसळला – ९ फेब्रुवारीला मुंबईत धडक मोर्चा
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात कार्यरत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे २७०० कर्मचाऱ्यांनी ९ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव व उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत यांनी याबाबत माहिती दिली.
या धडक मोर्चासाठी राज्यभरातील जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मुंबई येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, विभागाचे प्रधान सचिव पराग जैन तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांची भेट घेऊन प्रतिनिधींनी निवेदन सादर केले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन रखडले आहे. पगारावरच संसार चालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून अनेकांनी वेतनाच्या आधारे घेतलेले बँक कर्ज थकले आहे. बँकांकडून तगादे सुरू असून अनेक कर्मचाऱ्यांचा CIBIL स्कोअर देखील खराब झाला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. शासनाकडे निधी उपलब्ध असूनही तांत्रिक कारणे पुढे करून वेतन थांबवले जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशनमध्ये गेल्या २० वर्षांपासून अनेक कर्मचारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत. न्यायालयाने आऊटसोर्सिंगबाबत दिलेल्या निर्णयानंतरही विभागात कपातीच्या नावाखाली आऊटसोर्सिंगचा घाट घातला जात असल्याचा आरोप राज्य कृती समितीने केला आहे. तो तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यात स्वच्छतेत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात काम करणाऱ्या स्वच्छतादूत कर्मचाऱ्यांवर अन्याय, पिळवणूक व उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप करण्यात आला. WASH अंतर्गत सुमारे ९०० कर्मचारी बाह्यस्रोतामधून कार्यरत असून त्यांचीही पिळवणूक सुरू असल्याचे समितीने म्हटले आहे.
गेल्या दोन दशकांपासून पाणी व स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ९ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर सुरू होणारे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचे राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमांकात गायकवाड यांनी सांगितले.





