“स्वाभिमानाने जगायचे असेल तर राष्ट्रवादी (SP) हाच मार्ग”- लक्ष्मणराव ढोबळे: दक्षिण सोलापूर कार्याध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती
“स्वाभिमानाने जगायचे असेल तर राष्ट्रवादी (SP) हाच मार्ग”- लक्ष्मणराव ढोबळे: दक्षिण सोलापूर कार्याध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती

सोलापूर (प्रतिनिधी):- स्वाभिमानाने जगायचे असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाशिवाय पर्याय नाही. सत्तेच्या लालसेपोटी भाजपात प्रवेशासाठी लागलेली चढाओढ म्हणजेच आजच्या राजकारणाची दुर्दैवी अवस्था आहे, अशी घणाघाती टीका माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली. विचारांची कास धरून जनतेशी थेट संपर्क वाढवा आणि पक्ष मजबूत करा, असा स्पष्ट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची आढावा बैठक शुक्रवारी सोलापूर येथील हॉटेल सोना हॉलमध्ये पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे होते, तर निरीक्षक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय (दत्ता) घोडके यांनी तालुक्यातील संघटनात्मक स्थिती, पक्षाची ताकद आणि आगामी निवडणुकांतील संधी यांचा सविस्तर आढावा मांडला. उत्तर तालुक्याचे ओबीसी आघाडी अध्यक्ष दत्तात्रय निंबाळकर, बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ व युवा पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. प्रशांत गायकवाड (उळे) यांची तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यासह उपाध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, कार्यकारिणी सदस्य, प्रसिध्दी प्रमुख आणि युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना प्रा. ढोबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन शाल व पुष्पगुच्छाने सन्मानित करण्यात आले.
मार्गदर्शन करताना प्रा. ढोबळे म्हणाले की, “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढायच्या की महाविकास आघाडीच्या माध्यमातून, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र कार्यकर्त्यांनी आजपासूनच घराघरात जाऊन पक्षाचा विचार, धोरणे आणि शरद पवार साहेबांचे नेतृत्व जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे.” कार्यकर्त्यांना सर्वतोपरी बळ देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी अरुण तोडकर, प्रशांत गायकवाड, बळीराम हेबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत संघटन बळकटी, सामाजिक समतोल आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले. तालुक्याचा भौगोलिक, सामाजिक व राजकीय अभ्यास करून सर्व समाजघटकांना न्याय देण्याच्या भूमिकेतूनच या नियुक्त्या करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीला प्रकाश पटणे, मिलिंद मुळे, संगमेश बगले पाटील, उमाशंकर रावत, गणेश मोरे, सिद्धाराम कुंभार, अजिज शेख, पैगंबर मोमीन, आप्पाशा माने, निंगोंडा तळ्ळे, रेवणसिद्ध व्हनमाने, शंकर यादव, सिकंदर आवटे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



