सोलापूर : विजापूर रोड परिसरातील आदित्य हॉटेलजवळ थांबलेल्या जोडप्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करून सोन्याची चैन लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अवघ्या काही दिवसांत तपासाची दिशा शोधत तिघा आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून ₹1.47 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादीच्या निवेदनानुसार, तीन अज्ञात इसमांनी चाकूने वार करून जोडप्याला गंभीर जखमी केले आणि गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून फरार झाले होते.

पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून रेखाचित्रकाराच्या मदतीने संशयितांचे रेखाचित्र तयार केले. अभिलेखातील गुन्हेगारांच्या नोंदी तपासल्यानंतर मुख्य आरोपी म्हणून विकी दशरथ गायकवाड (वय २५, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६, कृष्ण मंदिराजवळ, सोलापूर) याची ओळख पटली.
डी.बी. पथकाने बाळे ब्रिज परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याचे साथीदार विनोद ऊर्फ रावण शवरप्पा गायकवाड (वय २५, रा. होटगी, दक्षिण सोलापूर) व जगदीश ऊर्फ बारक्या संगटे यांनाही अटक केली.

तिघांकडून लुटलेली सोन्याची चैन,
गुन्ह्यात वापरलेला चाकू,
मोटारसायकल
असा एकूण ₹1.47 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(६), ३११, ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, निरीक्षक सुशांत वराळे, सपोनि शितलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सफौ व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
धाडसी तपास व जलद कारवाईबद्दल नागरिकांनी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे कौतुक केले असून परिसरात पुन्हा जनसामान्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.








